BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पैशांच्या व्यवहारातून माजी सैनिकाने केले मित्राचे अपहरण

जळगावमधून चौघांना अटक

एमपीसी न्यूज – पैशांच्या व्यवहारातून माजी सैनिकासह सहा जणांनी मिळून युवकाचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री पिंपरी चौकात घडली. पिंपरी पोलिसांनी जळगाव पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेल्या युवकाची सुटका करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

यज्ञेश विनोद तिलवा (वय 33, रा . शिंदे वस्ती, रावेत) असे अपहरण आणि सुटका झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी माजी सैनिक दिलीप अवसरमल, किशोर सावंत आणि त्यांच्या चार साथीदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिलवा आणि आरोपींचा आर्थिक व्यवहार होता. त्या व्यवहारातील काही रक्कम तिलवा यांनी बँक खात्यात जमा केली होती. मात्र, आरोपींनी तिलवा यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे दिले नाहीत म्हणून आरोपींनी पिंपरी चौकातील विशाल थिएटर समोरून तिलवा यांचे सोमवारी रात्री अपहरण केले. आरोपींनी तिलवा यांना जळगाव येथे नेले.

तिलवा यांनी दिलीप अवसरमल, किशोर सावंत आणि साथीदारांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहार आणि वादाबाबत घरी सांगितले होते. सोमवारी रात्री तिलवा घरी आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नीने पिंपरी पोलिसात धाव घेतली. पिंपरी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तांत्रिक सहाय्यकाच्या मदतीने तपास केला. आरोपी जळगाव येथे असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी जळगाव पोलिसांच्या मदतीने आरोपींना बेड्या ठोकत तिलवा यांची सुटका केली.

HB_POST_END_FTR-A2