Pimpri: कार्यकारी अभियंता, दोन उपअभियंत्यावर 500 रुपये दंडाची कारवाई

एमपीसी न्यूज – अमृत अभियानाअंतर्गत उद्याव व ग्रीन स्पेसेस विकसित करण्याच्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत खातेनिहाय चौकशी सुरु केलेल्या दोन उपअभियंत्यांची चौकशी रद्द करत त्यांच्यावर 500 रुपये शास्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, पर्यवेक्षकीय कामकाजात कसूर केलेल्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यावर देखील 500 रुपये दंडात्मक कारवाई आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली आहे.

प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील निवृत्ती वाघुंडे, उपअभियंता विजय काळुराम जाधव आणि उपअभियंता सुनिलदत्त लहानु नरोटे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

पिपरी – चिंचवड महापालिका आस्थापनेवर गट ब च्या महत्वाच्या उपअभियंता या पदावर स्थापत्य विभागात जाधव आणि नरोटे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे केंद्र सरकार पुरस्कृत अमृत अभियानाअंतर्गत उद्यान, ग्रीन स्पेसेसे विकसित करण्याचे महत्वपुर्ण कामकाज सोपविण्यात आले आहे. या कामामध्ये अक्षम्य दिरंगाई झाल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली होती. तर, पर्यवेक्षकीय कामकाजात कसूर केल्याने कार्यकारी अभियंता वाघुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.

त्यावर नरोटे यांनी खुलासा केला. पुनावळे आरक्षण क्रमांक 4, 17 मध्ये ताब्यात असलेले उद्यान पुर्ण विकसित केले आहे. साईटवरील परिस्थिती ब्लॅक कॉटन सॉईलमुळे आणि पावसामुळे मुदतवाढ घ्यावी लागली. तथापि, निविदा अटी-शर्तीनुसार मुतदवाढीसाठी भाववाढ लागू नाही. त्यापोटी महापालिकेला आर्थिक तोशिष लागणार नाही. आजपर्यंत हा प्रकल्प 95 टक्के पुर्ण झाला असून खातेनिहाय चौकशी करु नये अशी विनंती केली.

जाधव यांनी देखील खुलासा केला असून सीडीसी तीन हा प्लॉ सखल भागात येतो. तेथे पावसाचे पाणी साचून दलदल निर्माण झाली होती. नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी, नगरसेवकांच्या सुचनेनुसार प्लॉटमध्ये भराव टाकून झाडे लावण्यात आलेली आहेत. या कामाला भाववाढ लागू नसल्याने मुदतवाढ देऊन काम पुर्ण करण्यात येईल. परिस्थितीचा विचार करुन कामात हलगर्जीपणा झाला नसल्याने खातेनिहाय चौकशी रद्द करण्याची मागणी केली होती.

तर, वाघुंडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयात आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आल्याने निवडणूक कामकाजाबरोबर उद्यान विभागाचे देखील कामकाज केले. कामांच्या साईटला भेट देऊन कामे पुर्ण केली आहेत. त्यामुळे शास्तीची कारवाई करु नये अशी विनंती केली होती.

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचे खुलासे आणि विभागप्रमुखांनी केलेली शिफारस विचारात घेता जाधव, नरोटे यांची खातेनिहाय चौकशी रद्द केली. जाधव, नरोटे आणि वाघुंडे यांच्यावर प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक शास्तीची कारवाई केली. दंडाची रक्कम नजीकच्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे. तसेच यापुढे कामकाजात दिरंगाई केल्यास जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.