Pimpri: घनकचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जनजागृतीसाठी 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान प्रदर्शन

एमपीसी न्यूज – घनकचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉलमध्ये 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

पिंपरी महापालिकेमार्फत सर्व गृहनिर्माण संस्था, हॉटेल व्यवसाय, मंगल कार्यालय, खाणावळ, हॉस्टेल, उपाहारगृह, शाळा-महाविद्यालये, भाजी मंडई आणि कृषी बाजार समिती यांच्यात कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढविण्यात येत आहे. तसेच नागरिक, व्यावसायिकांमध्ये कच-यावर प्रक्रीया करणे ते रिसायकलिंग करणे, त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेचा उद्देश आणि उद्दिष्टे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. त्यास महापालिका आयुक्तांचीही मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार, महापालिका आणि युनिट्रॅक सोल्युशन्स यांच्यावतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉलमध्ये 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2018 या कालावधीत सकाळी अकरा ते सात या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

त्याअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विषयक कार्यशाळा आणि प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात घनकच-यावर प्रक्रीया करणा-या अनेक नामांकित संस्था सहभागी होणार आहेत. तसेच शहरातील गृहसंकुलातील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देणार आहेत. या प्रदर्शनामुळे गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापनांना ओल्या व सुक्या कच-याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. या प्रदर्शनासाठी 16 ते 19 ऑगस्ट या चार दिवसांसाठी 10 लाख 17 हजार रूपये भाडे ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट यांना देण्यात येणार आहे.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.