Pimpri: पाणीपुरवठ्याची परस्पर ‘एनओसी’ देणे कार्यकारी अभियंत्याला भोवले !

सह शहर अभियंतापदाचा प्रभारी पदभार दुस-याच दिवशी केला कमी; कारणे दाखवा नोटीस; चौकशी सुरु 

एमपीसी न्यूज  – वाकड परिसरात पाणी टंचाई असल्याने नवीन व्यावसायिक बांधकांना पाणीपुरवठ्याचे ना-हरकत प्रमाणापत्र (एनओसी) देण्यास पालिका प्रशासनाने बंद केले होते. परंतु, कार्यकारी अभियंत्याने अचानक  परस्पर एनओसी देण्यास सुरुवात केली. एकाचदिवशी दहा बांधकाम व्यावसायिकाला एनओसी देण्यात आल्या. परस्पर एनओसी देणे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांना भोवले असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तांबे यांना देण्यात आलेले प्रभारी सहशहर अभियंतापदाचा पदभार दुस-याचदिवशीच काढून घेण्यात आला आहे. 

स्थायी समितीने पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरव, रहाटणी, ताथवडे, पुनावळे, मामुर्डी, किवळे या भागात बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला होता. ‘स्थायी’च्या ठरावावर कोणताही निर्णय झाला नसताना पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ‘ड’  क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत अंतर्गंत येणार्‍या वाकड, रहाटणी, काळेवाडी, पिंपळे निलख, ताथवडे, पिंपळे गुरव या भागात बांधकामांना एनओसी देणे बंद केले. मात्र, त्यांनी अचानकपणे गुरुवारी (दि.4) व शुक्रवार (दि.5) दोन दिवसांसाठी एनओसी वाटप सुरू केले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी त्याला हरकत घेतली. पाण्याच्या समस्या सुटली नसताना एनओसी देण्यास कशी सुरुवात केली असा सवाल उपस्थित केला. त्याची माहिती देण्यास आयुक्त हर्डीकर व तांबे यांनी टाळाटाळ केली. त्यावरून ठराविक बांधकाम व्यावसायिकांना एनओसी मिळवून देण्यासाठी आयुक्त परवानगी देतात. त्यातून आयुक्त पाणी प्रश्नांचे राजकारण करून भाजपला इलेक्शन फंड मिळवून देण्याचे अर्थकारण करत असल्याचा आरोप कलाटे यांनी केला होता.

याबाबत आयुक्त हर्डीकर यांना विचारले असता, त्यांनी हात झटकले आणि तांबे यांच्या अंगावर प्रकरण शेकले. तांबे यांनी परस्पर आपल्या अधिकार कक्षेत एनओसी चालू-बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली असून खुलासा मागितला आहे. शनिवारी (दि.6)खुलासा प्राप्त झाला आहे.  तसेच त्यांना देण्यात आलेला प्रभारी सहशहर अभियंतापदाचा पदभार देखील काढून घेण्यात आला आहे. सविस्तर चौकशी करुन उचित कारवाई केली जाणार आहे. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात येणार असून निकम यांच्याकडे सहशहर अभियंता पदाचा प्रभारी पदभार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.