BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापौरांच्या प्रभागातील दिवाबत्तीच्या नुतनीकरणासाठी एक कोटीचा खर्च!; स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या प्रभागातील रस्त्यांवरील दिवाबत्तीचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली गावठाणातील दिवाबत्तीच्या नुतनीकरणासाठी एक कोटी 4 लाख 84 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (बुधवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे दिवाबत्तीची कामे केली जातात. महापौर राहुल जाधव यांच्या प्रभाग क्रमांक दोनमधील रस्त्यांवरील दिवाबत्तीचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. तीन ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता.

  • राधा इलेक्ट्रीकल्स, यश इलेक्ट्रीकल्स आणि सुमी इलेक्ट्रीकल सर्व्हिसेस या तिघांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी राधा इलेक्ट्रीकल्स या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 21.7 टक्के कमी दराची होती. ही निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची आहे. तसेच ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम असल्याने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी 10 जुलै 2019 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली.

त्यानुसार राधा इलेक्ट्रीकल्स या ठेकेदाराकडून एक कोटी चार लाख 84 हजार 269 रुपयांमध्ये दिवाबत्तीची नुतनीकरणाची कामे करुन घेतली जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

याबाबत बोलताना महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘जाधववाडी परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. रस्त्यांवरील दिव्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. विकास आराखड्यातील रस्त्यांवर विद्युतचे नवीन पोल बसविण्यात येणार आहेत.’

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3