Pimpri : फेसबुक अकाउंट हॅक करून ऑनलाइन फसवणूक
एमपीसी न्यूज – नातेवाईकाचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावरून पैशांची मागणी केली. त्यानुसार गुगल पे वरून 10 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे घडली.
विकास रामबिहारी गुप्ता (वय 37, रा. अशोक थिएटर जवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी विकास यांचे नातेवाईक संतोष अवधबिहारी गुप्ता (वय 45, रा. कानपूर, उत्तरप्रदेश) यांचे फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक करून त्यावरून खोटी माहिती व मेसेज पाठवले. “मुझे 10 हजार रुपये चाहिए, बहुत अर्जंट है, कल शाम तक लौटा दुंगा,’ असे सांगून चोरट्याने 9336211389 या मोबाईल क्रमांकावर 10 हजार रुपये गुगल पे करण्यास भाग पाडून फिर्यादी विकास गुप्ता यांची ऑनलाइन फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.