Pimpri : पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार; भोंदूबाबाला अटक

एमपीसी न्यूज – पुत्रप्राप्ती होण्यासाठी तसेच घरात असलेले गुप्तधन काढून देण्यासाठी पाच बहिणींवर एका भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केले. आरोपी भोंदूबाबाचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी यांच्या बहिणीशी पुन्हा लग्न केले. या अघोरी भोंदूबाबाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार 22 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे.

सोमनाथ कैलास चव्हाण (वय 32, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा सोमनाथ याने फिर्यादी महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होऊ नये, यासाठी नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे.

पुत्रप्राप्ती व्हावी, गुप्तधन मिळावे आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घरात तीन उतारे व नग्नपूजा करावी लागेल, असा उपाय भोंदूबाबाने सांगितला. तसेच या पूजेसाठी तीन लाख रुपये खर्च येईल. माझी 11 हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल. हे तीन उतारे 15 दिवसात सुरू केले नाहीत तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवाला मोठा धोका असल्याची भीती देखील आरोपी भोंदूबाबाने दाखवली.

फिर्यादी महिलेच्या कुटुंबियांकडून पैसे उकळून फिर्यादी महिलेच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सर्व बहिणींना बाहेर जाताना झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ‘तुझ्या आई-वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या एका बहिणीसोबत उतारा काढण्याच्या बहाण्याने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. तसेच आरोपी भोंदूबाबाचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी यांच्या बहिणीशी पुन्हा लग्न केले.

याबाबत महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. भोंदूबाबावर भारतीय दंड विधान कलम 354, 354 (अ), 376, 376 (1) (ए), 376 (3), 376 (ए बी), 494, 496, पोक्सो, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.