Pimpri: ‘कोरोना’संदर्भात आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर ‘फेक मेसेज’ व्हायरल

आयुक्त कार्यालयाने केली पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियात पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औषध फवारणीचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे.

पिंपरीचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियावर टाकला गेलेला मेसेज चुकीचा व खोटा आहे, असे महापालिका आयुक्त कार्यालयाने कळविले आहे. सोशल मीडियावर शुक्रवारी दिवसभर आयुक्तांच्या नावाने मेसेज पसरविला जात होता. यामध्ये ‘शनिवारी रात्री दहानंतर व रविवारी सकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये, कोरोना हद्दपार करण्यासाठी हवेत औषधाची फवारणी करणार असल्याचे सांगण्यात आले होते.

हा मॅसेज पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या नावाने फिरत असल्याचे शुक्रवारी रात्री निदर्शनात आले. त्यानंतर आयुक्तांनी खात्री करून पोलिसांत तक्रार दिली. तर पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असून, रुग्णाची संख्या 12 वर पोहोचली आहे. कोरोनासंदर्भात सोशल मीडियावर अनेक फेक संदेश पसरत आहेत.  शुक्रवारी सायंकाळी पिपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने हा संदेश पसरविला गेला.

याबाबत श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘असा कोणताही संदेश मी पोस्ट केला नाही. हा संदेश फेक, फसवा आहे. नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. कोरोना संदर्भातील या संदेशाची माहिती पोलिसांना दिली आहे. चुकीचे संदेश पसरविण्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.