Pimpri: थकबाकी वसुलीत क्षेत्रीय कार्यालये अपयशी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका मालकीच्या इमारती, कार्यालये, सांस्कृतिक व विरंगुळा केंद्र, भाजी मंडई, मोकळा भूखंड, वसाहतीकडून भाडे वसुली करण्यात क्षेत्रीय कार्यालयांना अपयश आले आहे. भूमी व जिंदगी विभागाकडे आठ कोटी 69 लाख 56 हजार रुपयांची थकबाकी आहे.

महापालिका क्षेत्रीय प्रभागांतर्गत चालू आर्थिक वर्षात अनेक इमारतधारकांनी मासिक भरणा केला नाही. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांकडून वेळेत वसुली करणे गरजेचे आहे. पण, अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत काही मोकळ्या जागा आहे. त्यामुळे वसुली करण्यावर बंधने येत आहेत.

यात ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाची सर्वाधिक थकबाकी आहे. तरी, फक्त आठ जणांनाच नोटीस बजावल्या आहेत. त्याखालोखाल ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाने वार्षिक मागणीची माहिती दिलेली नसली. तरी, 12 लाख 85 हजार रुपयांची वसुली केली असून 23 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

भूमी व जिंदगी विभागाकडून वारंवार क्षेत्रीय कार्यालयांकडे मागणी, वसुली आणि थकबाकीची माहिती मागविली जाते. परंतु, क्षेत्रीय कार्यालये ती टाळतात. ‘क’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयाकडे 19 ते 25 लाख थकबाकी आहे. ‘ह’ कार्यालयाकडून एक कोटी 29 लाख रुपयांची मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.