Pimpri: महापालिका आस्थापनेवरील रिक्त पदे भरा -नगरसेवक संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आस्थापनेवरील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याची मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सागर गवळी, मोरेश्वर भोंडवे उपस्थित होते.

महापालिकेची लोकसंख्या जवळपास 22 लाखापेक्षा अधिक झाली असून महापालिकेचे क्षेत्रफळ 181 चौ.कि.मी. इतके आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अत्यावश्यक सेवा व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांची संख्या 8 झाली आहे. त्यामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालायाकरिता नव्याने कर्मचारी भरती न करता सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचारी वर्गातूनच काम करून घेण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध अधिकारी, कर्मचा-यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला असून वर्ग 1 व 2 च्या अधिका-यांकडे एकापेक्षा अधिक विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

  • महापालिका कार्यक्षेत्रामधील विविध विकासकामांसाठी आरक्षित केलेल्या शेतक-यांच्या जमिनी तसेच रस्ता रुंदीकरणाद्वारे बाधित होणा-या ज्या भूखंडधारकाचे 500 चौरस मीटर पासूनचे पुढील क्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेकरिता, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, संरक्षण क्षेत्राकरिता आणि म्हाडाचे गृह प्रकल्पाकरिता अथवा केंद्र शासन तसेच राज्य शासनाचे विविध प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

अशा सर्व पिंपरी-चिंचवडमधील प्रकल्पधारक बाधितांचे वारसदारांना नोकरीमध्ये सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करताना महाराष्ट्र शासनाचे नियमानुसार असलेले राखीव आरक्षणा व्यतिरिक्त जादा 20 टक्के अतिरिक्त आरक्षण राहील असा ठराव सन 2016 मध्ये महापालिका सभेने पारित केला आहे.

  • या सर्व बाबी विचारात घेता सद्यस्थितीत महापालिका आस्थापनेवर गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील संवर्गातील तब्बल 2763 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची तत्काळ भरती करण्याकामी मंजुरी द्यावी. त्यानुसार स्थानिक नागरिकांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.