Pimpri : चित्रपट निर्मितीसाठी अभ्यास महत्त्वाचा -दिग्दर्शक सुनील नाईक

एमपीसी न्यूज – अभिनयाचे अंग उपजत असले तरी त्याला पैलू पाडणे महत्त्वाचे असते. अभिनय हा शिकावाही लागतो. अभिनय ही एक कला आहे. आज कार्यशाळेत अभिनयाचे धडे गिरविले आणि उद्या अभिनेता/अभिनेत्री म्हणून उभे राहू, असे शक्मय नाही. चित्रपट निर्मिती ही प्रक्रियासुद्धा सोपी नाही. या सर्वांसाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. अभिनयासाठी अभ्यास जितका महत्त्वाचा तितकाच चित्रपट निर्मितीसाठी चित्रपटाचा रसस्वाद करता येणे महत्त्वाचे आहे. प्रथम चित्रपट पाहायला शिका मग, निर्मितीकडे वळा, असा सल्ला दिग्दर्शक सुनील नाईक यांनी दिला.

अभिनयाच्या आवडीला प्रशिक्षणाची जोड असली, तर या क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग अधिक सुकर होतो. अनेकांना आजकाल या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा असते. मात्र, केवळ इच्छा असून संधी मिळत नाही, तर त्यासाठी योग्य मार्गदर्शनही गरजेचे असते. त्यामुळे अभिनयाचे हे तंत्र शिकविणारी कार्यशाळा अमित गोरखे युथ फाऊंडेशन, कलारंग कलासंस्था आणि प्राईड फिल्म टेलिव्हिजन इन्स्टियूट यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे एक दिवसीय अभिनय कार्यशाळा घेण्यात आली.

  • चित्रपट पाहायला शिकणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्या निकषावर ही निवड केली आहे. लघुपट निर्माण करण्यापेक्षा त्यापूर्वी त्याचे तंत्र जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असे दिग्दर्शक दिपक रेगे म्हणाले.

कार्यशाळेत अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील, लेखक प्रमोद जोशी, निवेदक भाऊसाहेब कोकाटे, दिग्दर्शक दिपक रेगे, प्रसिद्ध नाट्य आणि सिने दिग्दर्शक सुनील नाईक, प्राईड इन्स्टियूटचे रवी कोंढाळकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अमित गोरखे युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे उपस्थित होते.

  • या बाबींचे दिले शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
    या कार्यशाळेत सिनेमा आणि मालिकांसाठी कसे ऑडिशन द्यावे, नाटक व अभिनय तंत्रातील फरक, कॅमेरासमोर काय करायला हवे आणि काय करायला नको, संवादफेक कशी असावी, आवाजाचा टोन कसा असावा, अभिनेता तसेच अभिनेत्रीने कोणती काळजी घ्यावी, भाव रसरुप कसे असावे, अभिनयात जीवंतपणा कसा आणावा, अभिनयाचे बेसिक तंत्र, व्यासपीठावरील वावर, संवादाच्या पाठंतरापासून अर्थ लक्षात घेत केला जाणारा सहज अभिनय अशा अनेक बाबींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.