Pimpri: …अखेर भाजपने ‘महाविकासआघाडी’ सरकारचे केले अभिनंदन

एमपीसी न्यूज – दोन महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने राज्य सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.

डिसेंबर महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी) आयोजित करण्यात आली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. 28 नोव्हेंबर रोजी शपथविधी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाला होता. 30 डिसेंबर रोजी ठाकरे सरकारचा विस्तार झाला.

महासभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी अनुमोदन दिले. राज्य सरकारच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याकरिता महापालिकेचे देखील सहकार्य मिळणे आवश्यक आहे, असे साने म्हणाले.

यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, महापालिकेतील सर्व नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे झाले आहेत. कोणाचा पक्ष राज्यात, केंद्रात आणि महापालिकेत सत्तेत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा. या प्रस्तावाला मी पाठिंबा देत आहे.

त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी सर्वांच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे सांगत ठराव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.