Pimpri: पालिकेची आर्थिक फसवणूक; ऑलिम्पिक खेळाडूवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pimpri: Financial Cheating of the municipality; Demand to file charges against Olympic athlete पिल्ले अकॅडमीने महापालिकेचे 2 लाख प्रति महिन्याप्रमाणे आजतोपर्यंत एकूण 24 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – विक्रम पिल्ले अकॅडमीकडून खेळाडूंची फसवणूक होत आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतीलच उत्तम खेळाडूंचा संघ तयार करण्यास बंधनकारक असताना देखील तसा संघ तयार न करता बाहेरील खेळाडूंचा समावेश करुन पिंपरी महापालिकेची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप करत ऑलिम्पिक खेळाडू विक्रम पिल्ले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ऑल इंडिया गोल्ड कप हॉकी स्पोर्टस असोसिअशनचे सचिव रमेश मकासरे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महेश रसाळ या राष्ट्रीय हॉकी खेळाडूने हा गंभीर प्रकार माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आणला होता. याबाबतचे पत्र त्यांनी देखील इ-मेलव्दारे पाठवले होते.

मात्र त्याची दखल न घेता महापालिकेने कोरोना काळात कोणत्याही व्यक्तीचे किंवा ठेकेदाराचे बिल अदा न करण्याचे ठरवले असताना देखील पिल्ले अकॅडमीला 14 लाखांचे बिल अदा केले.

पालिका आणि विक्रम पिल्ले अकॅडमी यांच्यामध्ये जून 2019 मध्ये सांमजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार विक्रम पिल्ले अकॅडमीला नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम (पॉलीग्रास) हे महापालिकेने फक्त पिंपरी-चिंचवड हद्दीतील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी सकाळ 7 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत मोफत उपलब्ध करुन दिले होते. तसेच स्टेडियमचे इतर व्यवस्थापनाचे असे एकूण दरमहा 2 लाख रुपये अकॅडमीला महापालिका अदा करत आहे.

मात्र झालेल्या करारातील ‘अ’ पत्रातील अटी व शर्ती धाब्यावर बसवून या अकॅडमीने पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीबाहेरील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. या बाबतची माहिती त्यांनी माहिती अधिकारात देखील न देता लपवल्याचे उघड झाले आहे.

नेमून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त इतर वेळेत ज्या खासगी शाळा, विद्यार्थी आणि अकॅडमींचे बुकींग विक्रम पिल्ले अकॅडमीने अधिकार नसताना देखील त्यांच्याकडून दर महा 500 रुपये आकारुन महापालिकेची फसवणूक केल्याचे पत्रात म्हटले आहे.

पिल्ले अकॅडमीने महापालिकेचे 2 लाख प्रति महिन्याप्रमाणे आजपर्यंत एकूण 24 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत पालिकेने विक्रम पिल्ले अकॅडमीसोबतचा करार रद्द करावा. तसेच स्वत: नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअमची सूत्रे हाती घेत पिंपरी-चिंचवड हद्दीतील हॉकी खेळाडुंच्या प्रशिक्षणाची सोय करावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.