Pimpri : पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेची कागदपत्रे दाखवून तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यक्तीकडून तीन लाख 18 हजार 50 रुपये घेतले. पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेचे बनावट लेटरहेड व शिक्का वापरून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र देत त्यांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भालचंद्र रघुनाथ पालव (वय 25), रोहित सुसेर नागवेकर, समीर, महेश (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 35 वर्षीय इसमाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट 2019 ते 23 सप्टेंबर 2019 या कालावधीत पीसीएमसी कॉलनी अजमेरा कॉम्प्लेक्स पिंपरी येथे ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी व्यक्तीला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विजयदीप संस्था मर्यादित डहाणू या अस्तित्वात नसलेल्या पतसंस्थेचे लेटरहेड व शिक्का तयार करून बनावट कर्ज मंजुरीचे पत्र फिर्यादीना दिले. त्यानंतर आरोपींनी ॲक्सिस बँकेचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगत फिर्यादीकडून तीन लाख 18 हजार 50 रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात घेतले. पैसे घेऊन फिर्यादीचे कर्ज मंजूर न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.