Pimpri: महापालिकेला आर्थिक झटका, करदात्यांचे 984 कोटी ‘येस’ बँकेत अडकले!

महापालिका आर्थिक अडचणीत, खासगी बँक असूनही ठेवी ठेवल्या, जबाबदारी कोणाची?

एमपीसी न्यूज – खासगी क्षेत्रातील येस बँकवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठा आर्थिक झटका बसला आहे. महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये येस बँकेत अडकले आहेत. त्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे. खासगी बँक असून देखील महापालिकेने येस बँकेत पैसे ठेवल्याने याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिक व्याजाची आस महापालिकेला धोकादायक ठरली आहे.

येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी (दि.5) निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे पिंपरी महापालिकेला देखील पैसे काढता येणार नाहीत. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातात.

येस बँक खासगी असल्याचे माहिती असून देखील पिंपरी महापालिकेने अधिक व्याजाच्या अपेक्षेने 2018 पासून या बँकेत दैनंदिन रोख भरणा करण्यास सुरुवात केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील त्याला मान्यता दिली. महापालिकेच्या येस बँकेत सुमारे 984 कोटी रुपये अडकले आहेत. त्यावर 8.15 टक्के व्याज मिळत होते. परंतु, येस बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे महापालिकेला मोठा झटका बसला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे. त्याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची भिती आहे. खासगी बँक असूनही दैनंदिन भरणा कसा केला असा सवाल उपस्थित केला जात आहे. याची जबाबदारी कोणाची? याचे उत्तर आयुक्तांना द्यावे लागणार आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेने देखील येस बँकेत ठेवी ठेवल्या होत्या. परंतु, बँकेची पत खालावताच पुणे महापालिकेने 366 कोटींची रक्कम वेळीच काढून घेतली. परंतु, पिंपरी महापालिकेला मात्र शहानपण सुचले नाही. त्यामुळे मोठा झटका बसला आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, ”पिंपरी महापालिकेच्या येस बँकेत 984 कोटी रुपयांच्या दैनंदिन भरणा होता. महापालिकेने ऑगस्ट 2018 पासून खासगी असलेल्या येस बँकेत ठेवी दैनंदिन भरणा करण्यास सुरुवात केली. त्यावर 8.15 टक्क्यांनी व्याज मिळत होते. 18 महिन्याच्या काळात 150 कोटी रुपये व्याज मिळाले आहे. महापालिकेकडे बाकीचे पैसे आहेत. त्यामुळे त्वरित एवढी अडचण येणार नाही. 30 दिवसांपर्यंतच निर्बंध आहेत. त्यानंतर नियमित कामकाज झाल्यावर पैसे काढता येतील. पैसे बुडणार नाहीत. तात्पुरते निर्बंध आहेत. बँक ऑफ बडोदा मध्ये देखील पैसे ठेवले आहेत. त्यामुळे वेतनावर, कामावर परिणाम होणार नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.