Pimpri: उद्यानात खेळताना मुलाची कंरगळी निकामी; उद्यानाचे ‘सेफ्टी’ ऑडीट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील उद्यानातील घसरगुंडीवर खेळत असताना पत्र्यात पाय अडकल्याने सहा वर्षाच्या मुलाची करंगळी निकामी झाली. यामुळे उद्यानातील निकृष्ट खेळणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या हद्दीतील सर्व उद्यानाचे ‘सेफ्टी’ ऑडीट करुन तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मुलाचे पालक मयूर जोशी यांनी महापालिकेकडे केली आहे.

मोशी, प्राधिकरणात वास्तव्यास असलेले मयूर जोशी यांचा सहा वर्षांचा अर्थव 24 डिसेंबर रोजी महापालिकेच्या संभाजीनगर येथील शिव शाहू संभाजी उद्यानात खेळण्यासाठी आला होता. खेळत असताना उद्यानातील घसरगुंडीच्या पत्र्यात अथर्व याचा उजवा पाय अडकून झालेल्या अपघातात त्याची कंरगळी तुटली आहे. याबाबत अथर्वचे वडील मयूर जोशी यांनी महापालिकेला पत्र लिहून या नादुरुस्त खेळणीमुळे झालेल्या अपघाची चौकशी करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय महापालिकेच्या हद्दीतील सर्व उद्यानाचे ‘सेफ्टी’ ऑडीट करुन तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

मयूर जोशी म्हणाले, ”संभाजीनगर येथील शिव शाहू संभाजी उद्यानातील घसरगुंडी महिन्याभरापासून नादुरुस्त आहे. याकडे देखभालीचे काम करणा-या कर्मचा-यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. घसरघुंडी वापरु नये असा फलक देखील याठिकाणी लावला नाही. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाचे याची चौकशी करावी. नुकसान भरपाई देण्यात यावी”

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, ”या अपघाताची चौकशी करण्यासाठी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाची नियुक्ती केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार त्यावर निर्णय घेण्यात येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.