Pimpri : टीडीआरच्या फाईलवर सही करण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘तू मला पन्नास हजार रुपये दिले, तर तुझे काम होईल. नाहीतर असेच तू वर्षभर चकरा मारत बसशील’ असे म्हणत टीडीआरच्या फाईलवर सही करण्यासाठी पैसे मागितल्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी संतोष डौलात कामठे (वय 35, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महापालिकेचा कनिष्ठ अभियंता अनिल राऊत (वय 52, रा. सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची पिंपळे निलख येथे साडेतेरा गुंठे जागा आहे. या जागेत ‘हाईव्ह 65’ नावाचा बांधकाम प्रकल्प सुरु आहे. त्या बांधकामासंदर्भात टीडीआरचे काम करण्यासाठी संतोष सोमवारी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागात गेले होते. त्यावेळी आरोपीने फाईलवर सही करण्यासाठी संतोष यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली.

‘तू मला पन्नास हजार रुपये दिले, तर तुझे काम होईल. नाहीतर असेच तू वर्षभर चकरा मारत बसशील’ असे आरोपीने म्हटले. तसेच टेबलवरील टोचा उचलून संतोष यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा अदखलपात्र दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.