Pimpri : भिंत खचल्याने घरात अडकलेल्या गरोदर महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – घराची भिंत खचल्याने दरवाजा बंद झाला. बाहेर पाडण्याचे मार्ग बंद झाले आणि घरामध्ये पाच महिन्यांची एक गरोदर महिला अडकल्याने परिसरात एकच कल्लोळ सुरु झाला. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच क्षणार्धात घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी भिंतीला छिद्र पाडून महिलेची सुटका केली. ही घटना आज (शनिवारी) दुपारीबाराच्या सुमारास पिंपरी मधील महात्मा फुले नगर येथे घडली.

संगीता केशवराम निषाद (वय 22) असे सुखरूप सुटका झालेल्या गरोदर महिलेचे नाव आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या महात्मा फुले नगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून गटार बांधण्याचे काम सुरु आहे. जवळच संगीता निषाद यांचे घर आहे. त्या पाच महिन्यांच्या गरोदर आहेत. आज सकाळी अचानक गटाराजवळची जमीन खचली आणि एक भिंत संगीता यांच्या घराच्या दरवाजावर पडली. यावेळी संगीता घरात एकट्याच होत्या. घराच्या दारावर भिंत पडल्याने घराबाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला. ही बाब लक्षात येताच त्यांनी आतून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

परिसरात एकच चर्चा सुरु झाली. घराभोवती बघ्यांची गर्दी जमा झाली. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच काही क्षणात संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन घराच्या ज्या बाजूला संगीता पोहोचू शकत होत्या, त्या बाजूच्या भिंतीला छिद्र पाडले. त्याद्वारे त्यांना काही मिनिटांमध्ये सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.

ही कामगिरी कैलास वाघेरे, चंद्रशेखर घुले, महेंद्र पाठक, विवेक खांदेवाड, प्रतीक कांबळे, विशाल लाडके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.