Pimpri: ‘वायसीएम’ रुग्णालयातील अग्निरोधक यंत्र ‘आउटडेटेड’!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील इमारतीत एखादी आगीची घटना घडल्यास तत्काळ उपाययोजना म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने अग्निरोधक यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र, यातील अनेक यंत्रांची कार्यक्षमता मुदत (व्हॅलिडिटी) संपलेली आहे. परंतु, याकडे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, वायसीएमची सुरक्षा रामभरोसे आहे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

अग्निशमन विभागाकडून महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयातील इमारतीमध्ये विविध ठिकाणी अग्निशमन यंत्रे बसविलेली आहेत. मात्र, त्यांची कार्यक्षमता कालावधी संपलेला आहे. सुमारे अडीच महिन्यांपूर्वीच कार्यक्षमता संपली आहे. 8 डिसेंबर 2019 रोजी त्याची मुदत संपली आहे. त्यामुळे वायसीएमची सुरक्षा रामभरोसे आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दररोज रुग्णांची मोठी संख्या असते. जिल्ह्यासह शहराच्या विविध भागामधून रुग्ण उपचारासाठी वायसीएमएचमध्ये येत असतात. त्यामुळे येथील सुरक्षेविषयी काळजी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, अग्निशमन विभागाने महापालिकेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. परिणामी, जोपर्यंत एखादी आग लागत नाही, तोपर्यंत त्या यंत्रांची दुरुस्ती होणार नाही का ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. वायसीएमएचची फायर ऑडिट करण्याची मागणी देखील केली जात आहे.

याबाबत बोलतानाचा वायसीएमएचचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”वायसीएम रुग्णालयातील काही अग्निशमन यंत्राची मुदत संपली आहे. त्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे. काही यंत्रे नव्याने बसविण्यात येणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.