Pimpri Fire News : पिंपरीतील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमनचे शर्थीचे प्रयत्न

एमपीसीन्यूज : पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म परिसरामध्ये करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या ठिकाणी आज (बुधवारी) सायंकाळी आग लागली. स्थानिक नगरसेवक संदीप वाघेरे यांनी त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केल्याने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  मिलिटरी डेअरी फार्म परिसरामध्ये काही वृक्षांना आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नगरसेवक संदीप वाघेरे यांना दिली. त्यावर वाघेरे यांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन अग्निशामक विभाग, वनविभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.

काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या तसेच खासगी टँकर मागविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात येईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.