Pimpri : पिंपरीत टेरेसवरील फायबर आणि फोमच्या साठ्याला आग

लॅपटॉपच्या ओव्हर चार्जिंगमुळे आग लागल्याची शक्यता

एमपीसी न्यूज – इमारतीच्या टेरेसवर ठेवलेल्या फायबर आणि फोमच्या साठ्याला आग लागली. पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना सोमवारी (दि. 9) दुपारी संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. लॅपटॉपच्या ओव्हर चार्जिंगमुळे स्पार्क होऊन ही आग लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी संत तुकाराम नगर येथील अक्षय सोसायटीच्या गच्चीवर आग लागली असल्याची माहिती विनय नाईक यांनी अग्निशमन केंद्रास दिली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्रातील तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या गच्चीवरून जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग बंद असल्याने दोन्ही बाजूच्या इमारतीच्या गच्चीवरून पाण्याचा मारा करत आग शमविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

गच्चीवर मोठ्या प्रमाणात फायबरचे पुतळे आणि ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच सॉफ्ट बोर्ड, फोमच्या गाद्या, कॉम्प्रेसर, काही लाकडी सामान, लॅपटॉप असे साहित्य साठवून ठेवले होते. बाजूच्या दोन्ही गच्चीवरून एक बाजूने होजरील आणि दुसऱ्या बाजूने होजच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत हळूहळू पुढे सरकत गच्चीच्या मोकळ्या भागात जळत असलेल्या साहित्यावर नियंत्रण मिळवले. गच्चीवरील खोलीत ज्वाला दिसत होत्या. जळालेल्या मलब्यातून वाट काढत पुढे जाऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी त्या खोलीतील आगीवरही नियंत्रण मिळवले. तब्बल पाऊण तासाने आगीवर नियंत्रण मिळविले.

खोलीतील एक लॅपटॉप चालू अवस्थेत चार्जिंगला लावला असल्याचे आढळले. घरात कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे शॉर्ट सर्किट किंवा लॅपटॉपच्या ओव्हर चार्जिंगमुळे बॅटरीतून स्पार्क होऊन आग लागली असण्याची शक्‍यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे.

वाहन चालक राजाराम चौरे, फायरमन कैलास वाघेरे, राजेंद्र गवळी, अनिल डिंबळे, शहाजी चंदनशिवे, दिलीप गायकवाड, अमोल चिपळूणकर, निलकंठ दुबे, सदाशिव मोरे, पंकज भेडके, सौरभ गिरकर, दीपेश पाटील, योगेश आव्हाड, ज्ञानेश्वर बढे, लखन बेंद्रे, अभिषेक दिघे, अभिजित गार्गे, समीर अहमद या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.