Pimpri: पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, 45 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूने आज (रविवारी) पहिला बळी घेतला. एका 45 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील हा कोरोनाचा 32 वा बळी आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत एकूण 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 12 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. शहरात 19 सक्रिय कोरोनाचे रुग्ण होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आता शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 18 झाली आहे.

या पुरुषाला गुरुवारी (दि.9) कोरोनाची लागण झाली होती.  हा पुरुष हिंजवडी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. मागील 20 दिवसांपासून तो सुट्टीवर होता. त्याला पाच  दिवसांपूर्वी त्रास होत होता. त्यामुळे तो चिंचवड परिसरातील महापालिकेच्या एका दवाखान्यात गेला होता. तेथून त्याला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. गुरुवारी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

त्याची प्रकृती गंभीर होती. या रुग्णावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दरम्यान, या पुरुषाला कोरोनाची लागण कोणाच्या संपर्कातून झाली होती हे अद्यापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. त्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आठ जण निगेटीव्ह आले होते.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 31  जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 16 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.