Pimpri: पहिले नगराध्यक्ष कै. अण्णासाहेब मगर यांचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ घोषित करा

माजी नगरसेवक अरुण बो-हाडे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार तथा पहिले नगराध्यक्ष, दिवंगत खासदार कै. अण्णासाहेब मगर यांची शंभरावी जयंती येत्या 26 एप्रिल 2019 रोजी आहे. या शहरासाठीचे त्यांचे योगदान आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे. या लोकनेत्याविषयी कृतज्ञता म्हणून महापालिकेने एप्रिल 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत “अण्णासाहेब मगर जन्मशताब्दी वर्ष” म्हणून घोषित करावे. त्याअनुषंगिक विविध कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अरुण बो-हाडे यांनी केली आहे. तसेच दापोडी ते निगडी या महामार्गाचे “कै. अण्णासाहेब मगर शताब्दी महामार्ग” असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात बो-हाडे यांनी म्हटले आहे की, दिवंगत खासदार कै. मार्तंड धोंडीबा तथा अण्णासाहेब मगर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे नेते होते. सन 1952 पासून त्यांनी तत्कालीन हवेली विधानसभेचे अनेक वर्षे नेतृत्व केले. त्याकाळी पिंपरी-चिंचवड परिसर हवेली विधानसभा क्षेत्रात समाविष्ट होता. त्यांच्याच प्रयत्नांनी सन 1970 मध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी या ग्रामपंचायती विलीन करून “पिंपरी-चिंचवड नवनगरपालिका” अस्तित्वात आली. त्यावेळी आमदार असलेल्या अण्णासाहेब मगर यांची शासनाने नगराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.

  • या शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. शहरातील नागरिकांसाठी शाळा, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक दवाखाने, उद्याने इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. पण, त्यांनी 1974 मध्ये नगरपालिकेची स्वतःची परिवहन व्यवस्था अर्थात पीसीएमटी सुरू केली. औद्योगिकीकरण आणि व्यापार, उद्योग याला चालना देऊन त्यांनी नगरपालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढविले. त्यामुळेच “श्रीमंत नगरपालिका” अशी शहराची संपूर्ण देशात सर्वदूर ओळख निर्माण झाली. देशात नावारुपाला आलेली आपली पिंपरी-चिंचवड महापालिका त्याच भक्कम पायावर उभी आहे.

सन 1977 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते खेड मतदारसंघातून खासदार झाले. त्यांनी हयातभर शेतकरी, कामगार आणि समाजातील सर्व घटकांसाठी भरीव कार्य केले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणून महापालिकेने जन्मशताब्दी वर्ष घोषित करावे, अशी मागणी बो-हाडे यांनी निवेदनातून केली आहे.

  • कै. अण्णासाहेब मगर यांचे या शहरावर अनंत उपकार आहेत, याची जाणीव प्रत्येक शहरवासियांना आहे. त्यामुळे महापालिकेने पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले तर ती खरी कृतज्ञता व्यक्त होईल. यानिमित्ताने शहरातील दापोडी ते निगडी या महामार्गाचे “कै. अण्णासाहेब मगर शताब्दी महामार्ग” असे नामकरण करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.