Pimpri: अठरा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक

दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत; 'गुन्हे शाखा युनिट चार' ची कामगिरी

एमपीसी न्यूज – व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे 18 लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ‘ गुन्हे शाखा युनिट चार’ च्या पथकाने ही कारवाई केली.
आकाश दयानंद कदम, प्रफुल्ल ऊर्फ कल्लू संजय वाघमारे, महेंद्र सोपान दुरगुडे, अजिनाथ बबन धुमाळ, जय उर्फ दादू पडळकर यांना अटक करण्यात आली आहे. तर,  या गुन्ह्यातील शुभम पवळे, ओंकार कुडले यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पवन करताळ आणि गोटया माने हे दोघे अद्याप फरारी आहेत.
याप्रकरणी दुधाराम भैराराम देवासी (वय 27, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी हे 28 सप्टेंबर रोजी सांगवी फाटा येथून पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या पाच आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील अठरा लाख रुपयांची रोकड व दुचाकीची चावी जबरदस्ती हिसकावून नेली. या गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट चार करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी पथकातील उपनिरीक्षक हर्षल कदम यांना खबर मिळाली की, फुटेजमध्ये दिसणारे आरोपी आकाश कदम व कल्लू वाघमारे कसबा पेठ येथील असून ते नवी सांगवी परिसरात आले आहेत. त्यानुसार त्यांनी नवी सांगवी परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील पाच लाख रुपयांची रोकड दोन दुचाकी आणि एक सोन्याची चेन असा नऊ लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ‘गुन्हे शाखा युनिट चार’ चे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी वासुदेव मुंढे, अदिनाथ मिसाळ, नारायण जाधव, संजय गवारे, संतोष असवले, शावरसिध्द पांढरे, लक्ष्मण आढारी, धर्मराज आवटे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, तुषार काळे, धनाजी शिंदे, आजीनाथ ओंबासे, नाजुका हुलावळे, अतुल लोखंडे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हा उघड
दरोड्याचा हा किचकट गुन्हा केवळ सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाला आहे. त्यामुळे सर्व नागरीक आणि व्यापारी यांना आपली सोसायटी, दुकान, ऑफीस, आदी ठिकाणी कॅमेरे बसवण्याचे आवाहन सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.