Pimpri: महापालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू, आयुक्तांचे परिपत्रक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यालयांना 29 फेब्रुवारी 2020 पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवारी सुट्टीचे दिवस असणार आहेत. कर्मचा-यांची कामाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कार्यालयातील कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. त्यांची कार्यालयीन वेळ पूर्वीप्रमाणेच राहील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारने राज्य शासकीय कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. 29 फेब्रुवारी 2020 पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा शासन आदेश सोमवारी जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना देखील अटी-शर्तीसह पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी काढले आहे.

येत्या शनिवारपासून महापालिकेच्या कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे. महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सुट्टीचे असणार आहेत. कार्यालयांच्या कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा असा राहणार आहे. वाहनचालकांच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी पावणेआठ ते सायंकाळी साडेसहा अशी राहील.

त्याचबरोबर कार्यालयीन वेळेमध्ये 4 जून 2019 च्या शासन परिपत्रकानुसार दुपारी दीड ते दोन या वेळेत अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भुत असणार आहे. यापूर्वी ज्या कार्यालयांना, कर्मचा-यांना दुसरा व चौथ्या शनिवारी सुट्टी लागू होती. त्याच कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा लागू राहील. माहिती तंत्रज्ञान विभागाने थम्ब बायोमॅट्रीक संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करावेत. या आदेशाची अंमलबजावणी सर्व शाखाधिका-यांनी त्वरित करावी.

शाळा तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालये, पाणीपुरवठा, अग्निशामक दल, सफाई कामगार आदींना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही. त्यांची कार्यालयीन वेळ पूर्वीप्रमाणेच राहील, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.