Pimpri: डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयामध्ये एका महिलेने केलेल्या अवयदानामुळे पाच जणांना मिळाले नवजीवन

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयामध्ये एका महिलेने केलेल्या अवयदानामुळे पाच जणांना नवजीवन मिळाले आहे. माझी आई अतिशय प्रेमळ होती. आई गेल्याचे दुःख आमच्या कुटुंबाला आहे. परंतु, आईचे अवयवदान करून इतर पाच व्यक्तींमध्ये आईला जिवंत पाहू शकू” अशी भावना अवयवदात्याच्या मुलाने व्यक्त केली.

पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये रविवारी (दि.13) 60 वर्षीय रुग्ण महिला मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित करण्यात आले होते. रुग्ण महिलेचा अपघात झाला होता. मेंदूला मार लागला होता. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदी नुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी रुग्णालयातील अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. रुग्णाच्या नातेवाईकांनी यकृत, दोन मूत्रपिन्ड, दोन नेत्रपटल हे अवयवदान करण्याचा संकल्प केला.

विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र पुणे यांच्या प्रतीक्षा यादीप्रमाणे यकृत, दोन मूत्रपिंड हे अवयव डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी येथेच अवयवदान व प्रत्यारोपण करण्यात आले. 61 वर्षीय पुरुष रुग्ण यकृत विकाराने ग्रस्त होते. या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण तर 47 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय स्त्री रुग्ण मूत्रपिंडविकाराने ग्रस्त या दोन्ही रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या रुग्णांना नवे जीवन मिळण्यास मदत झाली. जीवनदान देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली.

“अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी आनंददायी बाब आहे. परंतु, अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच जास्तीत-जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे”. अवयवदात्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आभार मानले,

“कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल व त्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले. नातेवाईकांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत. समाजातील लोकांनी अवयवदाना विषयी विचार करण्याची गरज आहे. आपण मरणानंतर ही इतरांना जीवनदान देऊ शकतो. अवयवदान हे एक चांगले पुण्याचे कार्य आहे यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे” असेही त्या म्हणाल्या.

या वर्षभरात आठ रुग्णांच्या कुटूंबीयांनी घेतलेल्या अवयवदानच्या निर्णयामुळे एकूण 20 रुग्णांना जीवनदान देण्यात यश मिळाले आहे. आतापर्यंत 9 यकृत, 67 मूत्रपिंड व 16 नेत्रपटल असे एकूण 92 अवयव हे डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

संपूर्ण प्रक्रियेसाठी सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता जाधव, ट्रस्टी डॉ. यशराज पाटील, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. डॉकटर्स टीममध्ये डॉ. तुषार दिघे, मूत्रपिंड तज्ञ्, डॉ. बिपीन विभुते यकृत विकार तञ्, शरीरशास्त्र विभागप्रमुख डॉ दिपाली काटे, डॉ. आशिष चुग मज्जसंस्था शल्यचिकित्सक, डॉ रेणू मगदूम नेत्रविकार तञ् विभागप्रमुख, डॉ. स्मिता जोशी भूलतज्ज्ञविभाग प्रमुख यांचा सहभाग होता.

डॉ. अमरजित सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. जे एस भवाळकर अधिष्ठाता, डॉ. एच एच चव्हाण वैद्यकीय अधीक्षक यांचे या प्रक्रियेत योगदान लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.