Pimpri:  पाच दिवसात वाढले पाच हजार रुण; रुग्णसंख्या 20 हजार पार 

Five thousand patients increased in five days; The number of patients crossed 20 thousand : आज (गुरुवारी) सायंकाळी सात वाजेपर्यंत  673 नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  दिवसाला एक हजारहून अधिक रुग्णांची भर पडत असून शहरातील रुग्णसंख्या 20 हजार पार झाली आहे. मागील पाच दिवसांत तब्बल पाच हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. 

आज (गुरुवारी) सायंकाळी सात वाजेपर्यंत  673 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 20 हजार 287 झाली आहे. 10 मार्च ते 30 जुलै या 153 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या 20 हजाराच्या पुढे गेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.  मागील काही दिवसांपासून दररोज  रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत.

रुग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच राहण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टपर्यंत 50 हजार होईल, असा कयास प्रशासनाचा आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

25 जुलै पर्यंत शहरातील रुग्णसंख्या 15 हजार होती. त्यानंतर  25 ते 30 जुलै या पाच दिवसात तब्बल पाच हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 20 हजार 287 वर पोहोचली आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 8110 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे.

या वयोगटातील 5848 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 2031 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 1957 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 2331 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

12, 445 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात,  7496 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे.

आजपर्यंत 12, 445 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या 7496 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 3197 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे.

तर, 782 रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून 90  रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 57 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.  तर, आजपर्यंत शहरातील 346 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.