Pimpri : शगुन चौकातील फुल विक्रेत्यांचे क्रोमा शोरूम शेजारील जागेत स्थलांतर

महासभेची मंजुरी

एमपीसी न्यूज – शगुन चौकातील फुल विक्रेत्यांना पिंपरीतील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे क्रोमा शोरूम शेजारील जागा त्यांना तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्वावर दिली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

पिंपरी – चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या फुलांच्या मागणीमुळे बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होते. मात्र, फुले बाजारास आवश्‍यक तेवढी जागा उपलब्ध नसल्याने शगुन चौकातील जागा अपुरी पडते. त्यामुळे त्याठिकाणी व्यापार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याशिवाय वाहतुकीची समस्यादेखील भेडसावते. जागेअभावी गेल्या 15 वर्षापासून फुल बाजार पहाटे सहा ते नऊ या वेळेत पिंपरीतील शगुन चौकात भरत आहे. जागेअभावी आणि वेळेअभावी वाढत्या फुल उत्पादनामुळे शेतक-यांना त्यांचा शेतीमाल पर्यायाने कमी भावाने विकावा लागतो. त्यामध्ये बरेच आर्थिक नुकसान होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 2017 पासून वेळोवेळी महापालिकेकडे कायमस्वरूपी जागेची मागणी होत आहे. त्यास अनुसरून महापालिका भूमी-जिंदगी विभागाकडील सर्व्हेअर यांनी आयुक्तांच्या सुचनेनुसार 28 नोव्हेंबर 2018 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरीतील क्रोमा शोरूम शेजारील जागेची पाहणी केली. फुल विक्रत्यांसाठी ही जागा योग्य असल्याचे 29 नोव्हेंबर 2018 रोजीच्या अहवालाद्वारे कळविले आहे. तसेच भूमी-जिंदगी विभागाकडील सर्व्हेअरने स्थळदर्शक नकाशानुसार किरकोळ स्वरूपाचे बदल करून या ठिकाणी फुल विक्रेत्यांच्या सोयीनुसार, तात्पुरत्या पत्राशेडमध्ये 30 ओटे उभारून जागा देणे योग्य वाटत असल्याबाबत कळविले आहे.

या ठिकाणी भविष्यात मल्टीस्टोरीज पार्कींगचे नियोजन असल्याने फुलबाजारासाठी तळ मजल्यावर काही जागा राखीव ठेवण्याबाबत प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा भुखंड क्रमांक दोनमधील 526.31 चौरसमीटर या जागेत फुल बाजारासाठी पत्राशेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानुसार, या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात पत्राशेडची उभारणी करून नगररचना विभागाच्या उपसंचालकांकडून भाडेदर प्राप्त करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या “ह’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत 11 महिने कराराने भुई भाड्याने देण्यात येईल. नगररचना उपसंचालकांकडील मूल्यांकनाच्या मान्यतेने कार्यवाही पूर्ण करुन जागा देण्यास मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.