Pimpri : धुक्यात हरवली उद्योगनगरी ! पाच ते सहा दिवसांत, कडाक्याच्या थंडीची शक्यता

एमपीसी न्यूज- डिसेंबर महिना थंडीशिवाय गेल्यानंतर आता नव्या वर्षांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी धुके पसरल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामान पसरल्यामुळे किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. शहरातील किमान तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होऊन काही दिवस थंडी पूर्णपणे गायब झाली होती. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात 7 ते 8 अंशांनी वाढ होऊन तापमान 15 ते 18 अंशांवर पोहोचले होते. गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस 5.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.

31 डिसेंबर नंतर हवामानामध्ये बदल होऊन उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाहातील अडथळे दूर झाले. जानेवारीच्या पहिल्या दिवशी किमान तापमान 10.8 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. यंदाच्या मोसमातील ते सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर त्यामध्ये किंचित वाढ होऊन आज कमाल 30 तर किमान 12.7 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मात्र कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे हवेत गारवा वाढल्याचे दिसून येत आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत, कडाक्याच्या थंडीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आज हवेतील गारव्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी दाट धुके पसरले होते. अगदी काही अंतरावरील देखील अस्पष्ट दिसत होते. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना या धुक्याचा आनंद घेता आला. वाहनचालक मात्र वेगमर्यादा पाळत वाहन चालवताना दिसून आले.

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर देखील दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. सूर्य उगवलेला असला तरीही देखील धुके पाहायला मिळत होते. त्यामुळे गाड्यांचे इंडिकेटर लावून वाहने चालवली जात होती तर काही वाहनचालक रस्त्याच्या कडेला थांबून धुके निवळण्याची वाट पाहत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.