Pimpri: केशरी शिधापत्रिकाधारकांनाही शनिवारपासून मिळणार धान्य

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना मे आणि जून या दोन महिन्यांकरित्याच्या सवलतीच्या दरात धान्यांचे वाटप येत्या शनिवार (दि.25) पासून होणार आहे. त्यासाठी रास्तभाव दुकाने 12 तास खुली ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आदेश काढले आहेत.  यासाठी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सरसकट नागरिकांना, अटी-शर्तीविना आणि आधार लिंक नसलेल्या रेशनधारकांनाही रेशन देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

राज्य सरकारने 1 मे पासून धान्य वाटप करण्याचा आदेश काढला होता. परंतु, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राहुल कलाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धान्यवाटप तत्काळ सुरु करण्याची विनंती केली. त्यावर पवार यांनी विभागीय आयुक्तांना  25 एप्रिलपासून धान्य वाटप करण्याचे आदेश दिले होते.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्वत्र अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे गोरगरीब रेशनकार्ड धारकांना तीन महिन्याचे रेशनमोफत देण्यास राज्य सरकारने सुरुवात केली. त्यामुळे बहुतांश नागरिकांची सोय झाली. परंतु, मागील कालावधीत अनेक रेशनची दुकाने बंद झाली आहेत. काही काळ्या यादीत गेल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे त्यांचे रेशन कार्डला आधार लिंक झालेले नाही. या रेशनकार्ड धारकांना पूर्वी धान्य मिळत होते. परंतु, ऑनलाईन न झाल्याने त्यांना धान्य मिळत नाही.

अशा नागरिकांची पिंपरी-चिंचवड शहरात, वाकड भागात मोठी संख्या आहे. काम बंद असल्यामुळे नागरिकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळ पैसे नाहीत. धान्यही मिळत नव्हते. त्यामुळे त्यांचे हाल होत होते. आधार लिंक करण्यास 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आधार लिंक न करता सर्व रेशनकार्ड धारकांना धान्य द्यावे. त्यासाठी रेशनदुकानदारांना वाढीव कोटा  द्यावा जेणेकरुन सर्वांना धान्य मिळेल अशी विनंती कलाटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांना केली होती.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आदेश काढले आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना मे, जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने धान्य देण्याबाबत मान्यता दिली आहे.

धान्यवाटपाचे कामकाज शनिवार (दि.25) पासून सुरु होणार आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर रास्तभाव दुकाने ठराविक वेळेपर्यंतच चालू आहेत. परंतु, केशरी शिधापत्रिकाधारकांना मे, जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता धान्य वाटप करताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रास्तभाव दुकाने 12 तास चालू राहतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 12 तास दुकाने चालू राहतील, कोणताही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.