Pimpri : फसव्या कंपनीद्वारे शेतकऱ्याला घातला 18 लाखांचा गंडा

कंपनीच्या चार सदस्यांना अटक; इतरांनाही कोट्यावधीचा गंडा घातल्याचे उघड

एमपीसी न्यूज – मेरीट लँडमार्क या फसव्या कंपनीद्वारे दामदुप्पट, बक्षीस आणि प्लॉट देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला तब्बल 18 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी कंपनीच्या चार सदस्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. कंपनीने इतर नागरिकांनाही कोट्यावधीचा गंडा घातल्याचा प्रकार यातून उघड झाला आहे.

महादेव विश्‍वनाथ साळुंके (वय 48, रा. सांगवी), महेश प्रकाश मुंगसे (वय 37, रा. चिखली), सुरेश भानुदास जाधव (वय 44, रा. देहुरोड), किरण प्रकाश अटपाळकर (वय 24, रा. हिंगणे, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील महादेव आणि सुरेश जाधव यांना अटक केली आहे. याप्रकरणी सोना आण्णा साठे (वय 43, रा. जवळके, अहमदनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपरी येथील कमला क्रॉस रोड येथे मेरीट लँडमार्क नावाच्या कंपनीचे ऑफीस सुरु केले होते. या कंपनीद्वारे त्यांनी साठे यांना विश्‍वासात घेतले आणि त्यांना दामदुप्पटीचे, बक्षिसाचे तसेच प्लॉट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख 18 लाख रुपये घेतले. यावेळी साठे यांना कंपनीच्या नावाच्या पावत्या आणि सर्टीफीकेट दिले. यातील कंपनीने आत्तापर्यंत 1 लाख 40 हजार रुपये साठे यांना कंपनीने दिले आहेत. मात्र, त्यानंतर एकही परतावा कंपनीने दिलेला नाही.

  • हा घोटाळा केवळ साठे यांच्यापुरताच नाही तर समृद्ध जीवनप्रमाणे अनेकांचे पैसे या कंपनीने बुडवल्याचा प्रकार सोमार आला आहे. यामध्ये मेरीट लँडमार्क ही कंपनी उघडून एजंटनी त्यांच्या जनसंपर्काचा वापर करत बीड, कोल्हापूर, पुणे, जळगाव आणि मुंबई येथील नागरिकांचे कोट्यावधी रुपये गोळा केले होते. त्या पैशांचा वापर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. याप्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.

ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, पोलीस नाईक जावेद बागसिराज, महिला पोलीस नाईक प्रतिभा मुळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.