Pimpri: महापालिका इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यालयात!

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन घेतला वाद ओढावून

एमपीसी न्यूज – भाजपचे घरगडी, दलाल, प्रवक्ते अशी टीका होत असतानाच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) थेट भाजपच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षाच्या कार्यक्रमाला आलेल्या पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी आयुक्तांनी सर्व शिष्टाचार संकेत बाजूला करत भाजप कार्यालयात जाऊन बंद दाराआड पालकमंत्र्यांशी ‘गुफ्तगू’ केले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यालयात गेले आहेत. यामुळे आयुक्त हर्डीकरांवर टीकेची झोड उठली असून आयुक्त भाजपचेच असल्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.

पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्या निमित्त चंद्रकात पाटील आणि राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्या निमित्त बाळा भेगडे यांच्या पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. पालकमंत्री आले मात्र, राज्यमंत्री गैरहजर राहिले. भाजपच्या मोरवाडीतील कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.

  • भाजपचे नवीन पक्ष कार्यालय महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांनी येणे अपेक्षित असताना स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांची ‘सरबारी’ केली. सोबतीला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना देखील भाजपच्या कार्यालयात आयुक्त घेऊन गेले. तासभर चाललेल्या भाजपच्या मिटिंगमध्ये आयुक्तांनी थांबणे त्यांनी पसंत केले. मिटिंग संपल्यानंतर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त भाजप कार्यालयातून बाहेर पडले.

शिष्टाचाराप्रमाणे पक्ष कार्यालयाच्या इमारतीच्या खाली अथवा गैरपक्षीय ठिकाणी आयुक्तांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करणे अपेक्षित असते. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांशी बंद दाराआड ‘गुफ्तगू’ केले. भाजपच्या बैठकीला हजेरी लावणे त्यांनी पसंत केले. तासभर चाललेल्या पक्षीय मिटिंगला ते उपस्थित राहिले.

  • महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एकही आयुक्ताने सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले नाही. मात्र, विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर त्याला अपवाद ठरले आहेत. यामुळे हर्डीकरांवर टीकेची झोड उठली असून आयुक्त हर्डीकर हे भाजपचेच असल्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.

पंधरा दिवसांपुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शहरात आले होते. शहर भाजपने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या भाजपच्या पक्षीय कार्यक्रमाला देखील महापालिकेतील जनता संपर्क आणि महापौर दालनातील कर्मचा-यांनी हजेरी लावली होती. या कर्मचा-यांवर आयुक्तांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. लेटलतीफ अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारणारे आयुक्त श्रावण हर्डीकर आता कोणती भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.