Pimpri: आजी-माजी नगरसेवक, त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण होणार

सभागृह नेते एकनाथ पवार यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेचे सर्व आजी-माजी नगरसेवक, त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करावे. एखाद्या नगरसेवकाने अथवा त्याच्या नातेवाईकाने मिळकतकराची चोरी केल्याचे उघडकीस आल्यास संबंधिताचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशा सूचना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आयुक्तांना केल्या आहेत. भाजपचा नगरसेवक असला तरी त्याला पाठिशी घालू नये असेही त्यांनी सांगितले आहे.

नगरसेवक हे जनतेला उत्तरदायित्व असतात. त्यामुळे आपले नगरसेवक मिळकतकर आणि पाणीबिल भरतात की नाही हे जाणून घेण्याचा त्यांना अधिकार आहे. नगरसेवकच महापालिकेची लूट करतात, असा जनतेचा समज झाला आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. त्याकरिता आजी-माजी सर्व नगरसेवकांच्या, त्यांच्या नातेवाईकांच्या मिळकतींचे सर्वेक्षण करावे.

मिळकत एकूण किती जागेत आहे. मिळकत कर किती जागेचा भरला जातो, हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. अशा मिळकतींना पुरविण्यात आलेल्या पाण्याचे बिल महापालिकेला अदा केले जाते का? हेही तपासण्यात यावे. त्यामध्ये एखाद्या आजी माजी नगरसेवकाने अथवा त्याच्या नातेवाईकाने मिळकतकराची चोरी केल्याचे उघडकीस आल्यास संबंधिताचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा. सत्ताधारी नगरसेवक असला तरी पाठीशी घालू नये.

शहरातील सर्व मॉल, मंगल कार्यालये मोठ्या प्रमाणात मिळकतकराची चोरी करत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे महापालिकेने नगरसेवकांच्या मिळकतींसह मॉल, मंगल कार्यालये व मोठ्या मिळकतींचे आणि प्रत्यक्षात भरल्या जाणाऱ्या मिळकतकराचे वास्तव जनतेसमोर मांडावे, अशी सूचनाही आयुक्त हर्डीकर यांना केल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.