Pimpri: मॉर्निग वॉकला बाहेर पडलेल्या माजी महापौरांना व्यायामाची शिक्षा अन् गुन्हाही दाखल

संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे 35 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – संचारबंदी असूनही आणि बाहेर पडू नका असे आवाहन करुनही सकाळी मॉर्निग वॉकला बाहेर पडणा-यांवर निगडी पोलिसांनी आज (शनिवारी) कारवाई केली आहे.  मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका माजी महापौरांसह 35 नागरिकांकडून परेड, सूर्यनमस्कार करुन घेतला. मी नियम मोडणार, अशी शपथ देत त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी देखील अशाच प्रकारे 13 नागरिकांवर कारवाई केली.

भाजपमध्ये असलेले माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह 35 जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा निगडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिक सकाळी मॉर्निग वॉकला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे निगडी पोलिसांकडून कालपासून मॉर्निग वॉकला बाहेर पडणा-यांवर कारवाई सुरु केली आहे. आज देखील आकुर्डी परिसरात कारवाई करण्यात आली.

आकुर्डी परिसरात मॉर्निग वॉकला बाहेर पडलेल्या नागरिकांकडून पोलिसांनी सूर्यनमस्कार करुन घेतले. त्याचबरोबर ”मी आदेश पाळत नाही, कारण मी उच्चशिक्षित दीडशहाणा आहे”, ‘गो कोरोना’, ‘मी स्वार्थी आहे, मी कोरोना फैलवण्यास मदत करत आहे, मी मॉर्निग वॉकर’ ‘मी अतिशहाणा आहे, ‘मी मॉर्निग वॉकला चाललो आहे गो कोरोना’, ‘मी गाढव आहे, मला सांगितलेले कळत नाही’ असा मजकूर असलेले फलक हातामध्ये देऊन मी नियम मोडणार अशी शपथ सर्वांना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, संचारबंदीचे उल्लंघन करू नये, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.