Pimpri : दररोज 1200 लोकांना मायेचा घास भरवताहेत चार ‘अन्नदूत मित्र’

एमपीसी न्यूज – कोरोना या साथीच्या आजारापासून बचावासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. पण या बंदी बरोबर रोजंदारी करणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या, कित्येक कामगार, मजूर, परगावचे कामगार व विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट बंद असल्यामुळे जेवण मिळण्याची पंचाईत होऊ लागली, अशा गरजू, गरीब आणि निराधार लोकांसाठी चार मित्र अन्नदूत म्हणून धावून आले. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी दररोज किमान बाराशे लोकांना अन्न पुरवण्याचे काम हे चार मित्र मिळून करत आहेत.

जसे कोरोनाचा सामना करण्यासाठी दवाखान्यात डॉक्टर, रस्त्यावर पोलीस रियल हिरोज म्हणून उभे आहेत तसेच भुकेल्यांना पोटभर जेवण देणारे हे सुद्धा एक रियल हिरोच आहेत. लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष दिनानाथ जोशी यांनी पुढाकार घेऊन या कार्याची सुरवात केली. या कामासाठी केटरिंगचा व्यवसाय करणारे रवींद्र भावे यांची मोलाची साथ मिळाली, तसेच प्रवीण पोहेकर आणि जसबिंदर सिंग यांनी सुद्धा त्यांच्या बरोबर एकत्र येऊन लॉकडाऊनच्या दिवसापासून या कामाला सुरुवात झाली.

महानगरपालिकेकडून आलेली मागणी आणि त्या मागणीला अनुसरून अन्नपुरवठा करणे हा प्राथमिक उद्देश दिनानाथ जोशी आणि मित्रांचा असतो. सुरुवातीला 300 लोकांना पालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी अन्न वाटप केले आणि आज तब्बल 1200 लोकांना अन्नपुरवठा या चार मित्रांकडून केला जात आहे.

रवींद्र भावे यांचा पस्तीस वर्षे जुना केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळे सर्व अन्न त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीच बनवले जाते. अन्न बनवण्यासाठी आवश्यक सर्व सुरक्षा, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता राखली जाते. तसेच सर्व अन्न हे उच्च दर्जाच्या पदार्थांपासून बनवले जाते. साधारण प्रतिव्यक्ती 14 रुपये इतका खर्च त्याच्यासाठी येतो.

महानगरपालिकेच्या मागणीनुसार अन्न तयार केले जाते आणि गाडीमध्ये भरून ते पालिकेच्या वितरण करणाऱ्या विभागाकडे सुपूर्त केले जाते. वितरण करण्यासाठी बजरंग दल तसेच आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी हे पॅकिंग केलेले अन्न मोशी, भोसरी, पिंपरी, राहटणी व इतर परिसरात वितरित करतात.

सर्व छाया : देवदत्त कशाळीकर.

या कामासाठी विविध लोकांकडून व स्वयंसेवी संस्थांकडून धान्य स्वरुपात व पैशांच्या स्वरुपात मदत जमा होत असते. या कामासाठी केटरिंग कर्मचारी दीपक शर्मा, राजेंद्र येडके, काशिनाथ चव्हाण, संध्या शेळके, महेश खांबल तसेच आई सुधा भावे, पत्नी रश्मी भावे, मुलगा अथर्व भावे आणि मुलगी श्रावणी भावे यांची या कामात मदत होते. कौतुकाची बाब म्हणजे केटरिंग कामगारांनी या कामाचे वेतन सुद्धा नाकारले आणि स्वच्छेने त्यांनी काम करण्याचे पसंद केले.  रवींद्र भावे – केटरिंग व्यावसायिक.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.