Pimpri: ‘चौदाशे’जण ‘होम क्वारंटाईन’; सव्वापाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1394 जणांना ‘होम क्वारंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील 5 लाख 22 हजार 753 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले असून आज आणखी पाच जणांचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, आज संशयित 18 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. मागील आठ दिवसांपासून एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 201 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 177 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 12 रुग्णांपैकी शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले आहे.

उर्वरित 9 रुग्णांपैकी 5 रुग्णांचे 14 दिवसानंतरचे घशातील द्रावाचे निगेटिव्ह आले आहेत. त्यानंतर आज (शनिवारी) 24 तासानंतरचा दुसरा नमुना तपासणीकरीता पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

तसेच आज 18 व्यक्तींना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या 244 कर्मचा-यांच्या टीमने शहरातील 5 लाख 22 हजार 753 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.