Pimpri: औद्योगिक कंपनीची फेकमेलद्वारे फसवणूक;  सायबर सेलने 65 लाख परत मिळवून दिले

एमपीसी न्यूज –  चाकण येथील पिनॅकल इक्विपमेंट कंपनीने मालाचे पैसे देण्यासाठी जर्मन येथील कंपनीबरोबर व्यवहार करताना एकाने फेक मेलकरून  दुसर्‍या बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगून कंपनीची 65 लाखांची फसवणूक केली.   संबंधित कंपनीने पैसे मिळाले नसल्याचे सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी जर्मनीतील बँकेशी मेलवरून संपर्क साधून कंपनीची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून दिली.

याबाबतची हकीकत अशी की, चाकण येथील पिनॅकल इक्विपमेंट या कंपनीचे जर्मनीतील कंपनीसोबत नियमित मालाचे देण्या-घेण्याचे व्यवहार होत होते. जर्मनीतील कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधीमार्फत हे व्यवहार व्हायचे. कंपनीच्या कार्यालयीन मेल आयडीवरुन मुंबईतील प्रतिनिधीच्या कार्यालयीन मेल आयडीवर मालाच्या आणि पेमेंटच्या संदर्भाने नियमित मेलींग होत होते. 16 मार्च 2020 रोजी पिनॅकल इक्विपमेंट   कंपनीच्या कार्यालयीन मेल आयडीवर त्यांचे नियमित व्यवहार होणा-या जर्मनीतील कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधीच्या मेल आयडीसारखाच दिसणा-या परंतू थोडासा बदल केलेल्या फेक मेल आयडीवरुन ही कंपनी त्यांची बँक बदलत असल्याचा मेल आला.

मुंबईतील प्रतिनिधीच्या कार्यालयीन मेल आयडीवर नियमित मेलींग होत असल्याने तक्रारदारांनी आलेल्या मेलचा आयडी व्यवस्थित न बघता, नवीन बँकेच्या डिटेल्स पाठविण्याबाबत कळविले. फेकमेल आयडीवरुन जर्मन देशातील Deutsche Bank PGK या बँकेमध्ये पेमेंट करण्यास सांगितले. त्यानुसार 20 मार्च रोजी तक्रारदारांनी त्यांच्या पुण्यातील बँक ऑफ बडोदाच्या खात्यावरुन जर्मनीतील डच बँकेच्या दिलेल्या खात्यावर 65 लाख 67 हजार 780 रुपये पाठविले.

तथापी, जर्मन कंपनीच्या मुंबईतील प्रतिनीधीने पेमेंट मिळाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी आलेला मेल चेक केला असता मेलमधील एका अक्षरामध्ये बदल केला असल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर सेलकडे तक्रार अर्ज दिला.

तक्रारीनुसार सायबर सेलेच्या पोलिसांनी तक्रारदाच्या कंपनीचे आणि जर्मन कंपनीच्या मुंबईतील प्रतिनिधीच्या मेल आयडीचे सायबर अॅनालीसीस केले. तक्रारदाराच्या कंपनीचा मेल आयडी हॅक न होता. कोणीतरी बनावट मेल आयडी तयार केल्याचे लक्षात आले. त्यामुळे तत्काळ जर्मनमधील ‘डच’ बँकेसोबत ई-मेलद्वारे पत्रव्यहार केला. या पैशांचा व्यवहार थांबविण्याचे कळविले.

डच बँकेकडे वारंवार पाठपुरावा करुन तक्रारदाराची फसवणूक झालेले 64 लाख 77 हजार रुपये परत मिळवून दिले. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर पोलिसांनी 2 लाख 51 हजार रूपये परत मिळवून दिले आहेत. ही कामगिरी सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.