Pimpri: ‘गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्तींना मोफत बस प्रवासाची सवलत द्या’

गुणवंत कामगार कल्याण परिषदेची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – राज्यातील कामगार पुरस्कारप्राप्तींना महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसने राज्यभरात मोफत बस प्रवासाची सवलत देण्यात यावी. त्यांना मोफत प्रवासाचे पास द्यावेत, अशी मागणी गुणवंत कामगार कल्याण परिषदेने परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे.

परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण, कार्याध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिवकर रावते यांची भेट घेऊन ही मागणी केली. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष रामराजे भोसले उपस्थित होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यातील कामगारांना दरवर्षी गुणवंत कामगार पुरस्काराने गौरविले जाते. कामगार कारखान्यांमध्ये प्रामाणिकपणे आपले कतर्व्य करत असतात. उर्वरित वेळेमध्ये कामगार समाजाची सेवा करतात. देश हिताच्या कर्तव्याकरिता तत्पर असतात. अशा राज्यातील हजारो कामगारांमधून सन 1979 पासून गुणवंत कामगारांची निवड केली जाते.

या गुणवंत कामगारांच्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र सरकार त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी या पदी नियुक्त करते. समाजातल्या वंचित घटकांना मदत करणे, रक्तदान शिबिर, राज्यातील कामगारांच्या समस्यांना न्याय देण्याचे कार्य गुणवंत कामगार करतात. राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास हे कामगार मदतीसाठी धावतात. त्यांना स्वखर्चाने राज्यभर प्रवास करावा लागतो. सरकारने त्यांना एसटीचा मोफत बसपास दिल्यांना सामाजिक कार्य करण्यास आणखीन वाव मिळेल. त्यासाठी गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्तींना मोफत बस पास देण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.