Pimpri : मराठा आंदोलकांवरचे खटले मोफत चालवणार ! पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचा निर्णय

एमपीसी न्यूज – राज्यात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे सुरु आहेत. आंदोलनकर्त्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत त्यांचे खटले मोफत लढविण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनने घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या सात मराठा आंदोलकांची ऍडव्होकेटस बारच्या वकिलांनी मोफत सेवा देऊन सुटका केली.

सनदशीर मार्गाने मराठा आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाज व त्यांच्या आंदोलनाला सर्वसंमतीने पाठिंबा दिला असल्याचे बारचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर यांनी सांगितले. तसेच या आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत देऊन त्यांच्या केसेस मोफत लढण्यासाठी पाच वकिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यात अॅड.आतिश लांडगे, अॅड.सुनील कड, अॅड.विजय शिंदे, अॅड.योगेश थंबा आणि अॅड. गणेश राऊत यांचा समावेश आहे.

दरम्यान, दि. 30 जुलै रोजी शहरात झालेल्या शोकसभेनंतर झालेल्या दगडफेकप्रकरणी सातजणांना दंगलीच्या गुन्ह्यात चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्यांना बुधवारी पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडीही मागण्यात आली होती. ही केस समितीने आपल्या हातात घेतली. समितीतील अॅड. लांडगे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. त्यांची न्यायालयीन कोठडी घेऊन नंतर त्यांची जामीनावर सुटका करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.