Pimpri : महापालिकेतर्फे अडीच हजार दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएलचा मोफत बसपास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 2616 दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांना पीएमपीएलचे मोफत बसपास वाटप करण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे 4 कोटी 25 लाख रुपये खर्च आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील अंध, अपंग, मूकबधीर आदी दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांना पीएमपीएलचे मोफत बसपास देण्यात येतात. सन 2018- 19 या आर्थिक वर्षांमध्ये त्यासाठी दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार 2616 अर्ज प्राप्त झाले आणि ते सर्व अर्जधारक पात्र ठरले आहेत. त्यातील 2244 दिव्यांगांचे ‘मी कार्ड’ नूतनीकरण करण्यात आले आहेत. तर, नवीन 372 दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थ्यांना ‘मी कार्ड’ काढून देण्यात आले आहेत.

प्रत्येकी 1400 रुपये प्रमाणे पीएमपीएल बसपासपोटी 4 कोटी 25 लाख 29 हजार 300 रुपये इतका खर्च झाला आहे. ही रक्कम मिळावी, यासाठी पीएमपीएलच्या सह व्यवस्थापकीय संचालकांनी बिल सादर केले आहे. सन 2018-19 या आर्थिक वर्षात ‘नि:समर्थ, कर्णबधीर, अंध विद्यार्थी, व्यक्तींना मोफत पीएमपीएल बसपास’ या उपलेखाशिर्षावर साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही रक्कम शिल्लक आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पीएमपीएल प्रशासनाला यापुर्वी अडीच कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. उर्वरित 1 कोटी 75 लाख 29 हजार 800 रुपये इतकी रक्कम अदा करावयाची आहे. ही रक्कम सन 2018-19 च्या आर्थिक वर्षातील तरतूदीतून अदा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.