Pimpri: अत्यावश्यक सेवेतील 193 कर्मचार्‍यांना पीएमपीएलचा मोफत पास

महापौर उषा ढोरे यांची माहिती  

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधात लढणार्‍या 193 अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना बसने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे  या कर्मचार्‍यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने दोन महिने कालावधीकरीता मोफत बस पास उपलब्ध करुन दिला आहे. 23 जूनपर्यंत या कर्मचार्‍यांना पीएमपीएमल बस मधून विनामुल्य प्रवास करता येणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने युद्धपातळीवर उपाय योजना सुरु आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सेवा बजावण्यासाठी घरापासून आपल्या कामकाजाच्या ठिकाणापर्यंत प्रवास करावा लागतो. ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही अथवा जे कर्मचारी बसने प्रवास करु इच्छितात त्यांना प्रवास करण्यासाठी पुणे महानगरपरिवहन महामंडळातर्फे बस प्रवासासाठीचा मोफत पास देण्यात आला. या पासचे औपचारिक हस्तांतरण  प्रशासनाकडे महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पीएमपीएमलचे समन्वयक अधिकारी संतोष माने, महापालिका कर्मचारी आबा गोरे, महादेव बोत्रे, वैभव देवकर, सुरेश खत्री, विजय मुंडे, गणेश कौठेकर, पांडुरंग मस्के, सामाजिक कार्यकर्ते संजय कुटे आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणि भोसरी येथील रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याठिकाणी डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आया, वॉर्डबॉय आदी कर्मचारी काम करतात. यातील जवळपास 193 अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना बसने प्रवास करावा लागतो. या कर्मचार्‍यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाने दोन महिने कालावधीकरीता मोफत बस पास उपलब्ध करुन दिला आहे. 23 जून पर्यंत या कर्मचार्‍यांना पीएमपीएमल बस मधून विनामुल्य प्रवास करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.