Pimpri: मैत्री राजकरणापलिकडची…..वेगळ्या पक्षात असूनही जपले ऋणानुबंध !

आमदार महेशदादांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची छबी

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय नेत्यांनी वेगळ्या-वेगळ्या पक्षात असूनही आपली पक्षापलिकडची मैत्री कायम ठेवली आहे. भोसरीचे भाजपा संलग्न आमदार महेश (दादा) लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर झळकलेल्या फलकांवर विरोधी पक्षातील नगरसेवक आहेत. पिंपरीत झळकलेल्या फलकावर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवकांची छबी झळकली आहे. ‘मैत्री …..राजकारणा पलीकडची’ असा फलकांवर मजकूर लिहिला आहे. पक्षाचे वेगळे विचार पक्षाच्या व्यासपीठावर, मात्र मैत्री वेगळी हा संदेश या फलकांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील जुन्या नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. एकमेकांचे तोंड देखील त्यांच्याकडून पाहिले जात नाही. एका कार्यक्रमात असल्यावर नामोल्लेख देखील केला जात नाही. त्यामुळे जुन्या नेत्यांमध्ये राजकीय अपरिपक्तवता असल्याचे नेहमीच बोलले जाते. परंतु, राजकारणातील मधल्या तसेच नव्या पिढीने जुन्या नेत्यांचा आदर्श घेतला नाही. त्यांनी आपली पक्षापलिकडची मैत्री जपली आहे. पक्ष बदलले तरी त्यांच्या मैत्रीत कोणतीही कटुता आलेली नाही. त्यांनी पक्षविरहित मैत्री कायम ठेवल्याचे चित्र समोर आले आहे.

भोसरीचे भाजपा संलग्न आमदार महेश (दादा) लांडगे यांचा वाढदिवस येत्या मंगळवारी (दि.27)रोजी आहे. त्यांना शुभेच्छा देणारे फलक शहरभर झळकले आहेत. आगामी वर्ष निवडणुकीचे असून वाढदिवसाचे निमित्त साधत दादांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. पिंपरी, भोसरीचा परिसर ‘दादा’मय झाला आहे. सत्ताधारी भाजपमधील दादांच्या समर्थकांनी तर फलक लावलेच आहेत. परंतु, महेशदादा पूर्वी ज्या पक्षात होते. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्या मित्रांच्या छबी देखील त्यांच्या फलकांवर झळकल्या आहेत.

महेशदादांच्या फलकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, राष्ट्रवादीचे नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य राजू मिसाळ, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी यांची छबी छळकली आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व सध्या भाजपात असलेले राजेश पिल्ले, शांताराम (बापू) भालेकर यांची देखील छबी आहे. ‘मैत्री …..राजकारणा पलीकडची’ असा फलकांवर मजकूर लिहिला आहे. पक्षाचे वेगळे विचार पक्षाच्या व्यासपीठावर, मात्र मैत्री वेगळी हा संदेश या फलकांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महेशदादांनी महापालिकेत एकत्र काम केले आहे. अनेक वर्ष एकाच पक्षात कार्यरत होते. पक्ष बदलेले तरी त्यांच्यातील मैत्रीमध्ये कोणतीही कठूता निर्माण झाली नाही. परिपक्तवतेचे राजकारण आहे. सुदृढ लोकशाहीचे चांगले लक्षण आहे. पक्षाचे विचार वेगळे आणि मैत्री वेगळी हे शुभेच्छा फलकाच्या माध्यमातून त्यांनी हा संदेश दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.