Pimpri: ‘अमृत’ योजनेसाठी केंद्र, राज्य सरकारकडून 25 कोटीचा निधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 25.56 कोटी रुपयांच्या निधीचा दुसरा हप्ता मंजूर झाला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा 17.4 कोटी आणि राज्य सरकारचा 8.52 कोटीचा निधी आहे. आजपर्यंत अमृतच्या कामासाठी एकूण 58.13 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे.

केंद्र शासनामार्फत राबविल्या जाणा-या अमृत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाणीपुरवठा, मलनिःसारण व हरित क्षेत्र विकास प्रकल्प सुरु आहेत. आकुर्डी, पुनावळे, च-होलीत उद्यान विकसित करण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पांसाठी 396.41 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी केंद्र व राज्य सरकारचा मंजूर हिस्सा 50 टक्के म्हणजेच 199.34 कोटी इतका आहे. त्यापैकी 25.56 कोटी निधी सोमवारी (दि. 10) राज्य सरकारमार्फत महापालिकेला प्राप्त झाला आहे.

त्यामध्ये पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्यासाठी केंद्र सरकारचा 7.84 कोटी तर राज्य सरकारचा 3.92 कोटी असा एकूण 11.76 कोटी आणि पुरवठ्याच्या दुस-या टप्यासाठी केंद्र सरकारचा 8.35 कोटी तर राज्य सरकारचा 4.1 लाख 75 हजार असा एकूण 12.53 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आकुर्डीतील विकसित करण्यात येणा-या उद्यानाच्या कामासाठी केंद्र सरकारने 16 लाख आणि राज्य सरकारने 8 लाख असा 24 लाखाचा तिसरा हप्ता दिला आहे.

पुनावळेतील उद्यानासाठी केंद्र सरकारचे 29 लाख आणि राज्य सरकारचे 1 लाख 45 हजार असे 4 लाख 35 हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळाला आहे. च-होलीतील आरक्षण क्रमांक 2-64 येथील उद्यानासाठी केंद्र सरकारचे 5 लाख 44 हजार आणि राज्य सरकारचे 2 लाख 72 असा एकूण 8 लाख 16 हजार रुपयांचा दुसरा हप्ता प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारचे 17.04 कोटी तर राज्य सरकारचे 8.52 कोटी असे एकूण 25.56 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

पहिल्या हप्त्यापोटी 32.57 कोटी इतका निधी महापालिका मिळाला आहे. ती रक्कम महापालिकेकडून सदर प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी वापरण्यात आली आहे. या प्रकल्पांचे काम नियोजनाप्रमाणे सुरु असून ती कामे नियोजित वेळेत पूर्ण होईल यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे महापालिकेने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.