Pimpri: ‘ई-लर्निंग’चे 85 लाख वळविणार विद्यार्थ्यांच्या स्वेटर, गणवेशासाठी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बालवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वेटर, खेळ गणवेश खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, या खरेदीसाठी रक्कम कमी पडत असल्याने ई-लर्निंग या लेखाशिर्षावरील 85 लाख रूपये गणवेश, स्वेटर खरेदीसाठी वळविण्याचा निर्णय महापालिका शिक्षण मंडळाने घेतला आहे.

महापालिकेच्या सन 2018-19 मधील प्राथमिक शिक्षण विभागाकडील अर्थसंकल्पात महसुली खर्चामधील शालेय विद्यार्थी स्वेटर, खेळ गणवेश, विद्यार्थी गणवेश आणि बालवाडी गणवेश व बालवाडी स्वेटर या लेखाशिर्षावर 1 कोटी 27 लाख 94 हजार रूपये इतके बील देणे बाकी आहे. या लेखाशिर्षावर केवळ 23 लाख 29 हजार रूपये इतकी रक्कम शिल्लक आहे. देय रकमेपैकी 84 लाख 94 हजार रूपये इतकी रक्कम कमी पडत आहे. त्यामुळे शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी हे बील देण्यासाठी ई-लर्निंग या लेखाशिर्षावरील शिल्लक रकमेतून 84 लाख 94 हजार रूपये वळविण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार, ई-लर्निंग लेखाशिर्षावरील शिल्लक रकमेतून शालेय विद्यार्थी स्वेटर या लेखाशिर्षावर 3 लाख 69 हजार रूपये, खेळ गणवेश यावर 48 लाख 91 हजार रूपये आणि विद्यार्थी गणवेश लेखाशिर्षावर 32 लाख 33 हजार रूपये अशी एकूण 84 लाख 94 हजार रूपये रक्कम वळविण्यात येणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात शालेय साहित्यापैकी शालेय बुट आणि मोजे या साहित्यासाठी अपूर्ण तरतूद आहे. अद्याप हे साहित्य वाटप करण्यासाठी कार्यवाही झालेली नाही. कार्यवाहीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाच्या सन 2018-19 च्या मुळ अर्थसंकल्पात बालवाडी दप्तरे या लेखाशिर्षावरील 28 लाख रूपये शालेय बुट आणि मोजे खरेदीसाठी वळविण्यात येणार आहे. अर्थसंकल्पातील वर्गिकरण करावयाच्या लेखाशिर्षातून सध्या कोणतेही काम सुरू नाही. तसेच सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात कोणतेही काम प्रस्तावित नाही. त्यामुळे या लेखाशिर्षातून तरतुद खर्ची पडणार नसल्याने ही रक्कम वळविण्यात येणार आहे. तसेच साहित्य खरेदीसाठी वाढीव रकमेच्या आवश्यकतेनुसार सुधारीत तरतुदीमधून रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.