Pimpri : कचरा जाळणे, रस्त्यांवर टाकणा-यांकडून 40 हजार रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे चाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहर स्वच्छतेचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. प्रत्येकाने स्वच्छतेसाठी सहकार्य करणे आवश्यक असून त्याद्वारे शहर सुंदर व स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. रस्त्यावर कचरा टाकून दुर्गंधी पसरवू नये तसेच पर्यावरणप्रदूषण करू नये, असे आवाहन केले आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आरोग्य विभागाचे पथके कार्यरत आहेत.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी.कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम.भोसले, आरोग्य निरीक्षक वैभव कांचनगौडार, अंकुश झिटे व विजय दवाळे यांच्या पथकाने कुदळवाडी, चिखली, इंद्रायणीनगर, धावडेवस्ती, कामगारनगर, खराळवाडी येथे कारवाई करून सुमारे चाळीस हजार रुपये इतका दंड वसूल केला.

रस्त्यावर कचरा जाळणाऱ्या कुदळवाडी परिसरातील व्यावसायिकांकडून पाच हजार, खराळवाडी येथील लोटस कोर्ट या हॉटेलवर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल पाच हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच व्यावसायिक भंगार कचरा रस्त्यावर जाळणाऱ्या सद्गुरूनगर, धावडेवस्ती येथील व्यावसायिकाकडून पंचवीस हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.