Pimpri : रक्षणकर्त्यांच्या घरी सुखकर्ता… दुःखहर्ता…

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य वाढवणारा उत्सव आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पुढील दहा दिवस हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. द्वेष, मत्सर सर्वकाही विसरून सगळे लोक या उत्सवात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभाग घेतात. समाजाच्या रक्षणासाठी अहोरात्र तत्पर असणा-या पोलिसांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. पण पोलिसांच्या बदल्यांमुळे बहुतांश पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बॅचलर राहतात. त्यामुळे ते नागरिकांच्या गणेशोत्सवालाच आपला गणेशोत्सव मानतात आणि समाजाचे रक्षण करून तो साजरा करतात. समाजाच्या ख-या रक्षणकर्त्यांच्या घरी बाप्पा विराजमान होतो, पण त्यांची सेवा करण्यासाठी पोलिसांना मात्र वेळच मिळत नाही.

सण, उत्सव, निवडणुका आणि अन्य कामांच्या वेळी पोलिसांना रात्रंदिवस कामावर हजर राहावे लागते. बहुतांश वेळेला चार-चार दिवस घरी जाता येत नाही. जरी गेलंच तरी कधी परत जावे लागेल, याची त्यांना खात्री नसते. त्यामुळे पोलिसांचे सण, उत्सवाच्या काळात ड्युटीवरून घरी जाणं आणि येणं दोन्हीही त्यांच्या हातात नसतं. संपूर्ण शहर विविध पद्धतीने उत्सव साजरा करत असतं. पण पोलीस मात्र नागरिकांच्या रक्षणासाठी पहारा देण्यात व्यस्त असतात. उत्सवात सहभाग घेऊन आपणही आनंद घ्यावा, ही इच्छा त्यांना मनोमन दाबावी लागते. इच्छा असूनही ती पूर्ण करण्याची त्यांना मुभा नसते. कारण, उत्सवात नागरिकांच्या आनंदी चेह-यावरील आनंद कायम ठेवण्यासाठी त्यांना तैनात राहावं लागतं.

पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वारंवार होत असलेल्या बदल्या आणि कामाचे स्वरूप पाहता त्यांना त्यांचे संपूर्ण बि-हाड वारंवार हलवणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या मूळ गावी कायम बस्तान बसवून पोलीस एकटेच राज्याच्या पाठीवर फिरत असतात. कधी जिल्ह्यांतर्गत तर कधी जिल्ह्याबाहेर बदली होते. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि घरच्यांच्या जबाबदा-या पार पाडण्यासाठी हेळसांड होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बॅचलर राहत आहेत. वारंवार होत असलेल्या बदल्यांमुळे त्यांना अशा प्रकारे राहावे लागत आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पण बहुतांश पोलीस त्यांच्या घरच्या गणेशोत्सवात न राहता शहरवासीयांच्या उत्सवात व्यस्त आहेत.

‘सुखकर्ता….. दुःखहर्ता….. ‘असणा-या श्री गणेशाची शेकडो मंडळे प्रतिष्ठापना करतात. काही मंडळे पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना उत्सवात सहभागी करून घेतात. अनेकांना गणेशाच्या आरतीचा मान मिळतो. यानंतर लगेच पोलीस आपल्या कर्तव्यावर हजर राहतात. ज्यांचे कुटुंब सोबत आहे, ते पोलीस देखील वेळ देता येत नसल्याने घरच्यांना गावी पाठवून तिकडे गणेशोत्सव साजरा करतात आणि स्वतः ड्युटी करून गणेशोत्सव आणि इतर सर्वच सण, उत्सव साजरे करतात. यातूनही वेळेचे नियोजन बसवून काही पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.

पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या घरी श्रीपाद श्रीवल्लभासोबत गणपती
सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सारंग, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप

 

 

 

 

पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस कर्मचारी नाजुका हुलावळे

 

 

पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.