Pimpri : ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात घरोघरी बाप्पा विराजमान !

एमपीसी न्यूज- आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर जय्यत तयारीला लागलेले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून बाप्पांच्या आगमनासाठी मिरवणुकीची तयारी करण्यात मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची लगबग सुरु आहे. आज पहाटेपासूनच घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्यामुळे काल बुधवारी संध्याकाळीच सर्वांगसुंदर गणेश मूर्ती घरी आणण्यास सुरुवात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले आहे. सकाळपासून लहान, मोठ्यांसह सर्वांची बाप्पाची मूर्ती घरी आणण्यासाठीच लगबग सुरु होती. निगडी, भोसरी, चिंचवड, आकुर्डी, पिंपरीगाव, पिंपळेगुरुव, पिंपळेसौदागर, रहाटणी, काळेवाडी, वाकड, चिंचवड, चापेकर चौक या परिसरात गणपतीचे स्टॉल आहेत. नागरिकांची गणेश मूर्ती घरी आणण्याची लगबग सुरु होती. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया’, ‘एक दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार’ असा बाप्पाचा जयजयकार करत घरोघरी बापांचे आगमन झाले आहे. संपुर्ण शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. ढोल-ताशांच्या दणदणाटात मिरवणूक काढत गणपतींची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे तयार करण्याची लगबग सुरु असून उद्यापासून नागरिकांना देखावे पहायला मिळणार आहेत. यंदा गणेश मंडळांनी पौरणिक, सामाजिक विषयावरील जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे.

  

  

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.