Pimpri : न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने शिक्षकाचा आत्मदहनाचा इशारा

एमपीसी न्यूज – शिक्षण सेवक या पदाला मान्यता देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने दोनवेळा आदेश देऊनही त्याची अमंलबजावणी करण्याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शिक्षकाने पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केले. शिक्षण विभागाने पाच दिवसात शिक्षकपदाला मान्यता देण्याचे आश्वासन देत उपोषण सोडायला लावले. परंतु, उपोषण सोडल्यानंतर प्रशासनाने पदाला मान्यता देण्यास पुन्हा टाळाटाळ सुरु केल्याने हताश, निराश झालेल्या गणेश शिंदे या शिक्षकाने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 5 मार्च रोजी उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करुन जीवन संपविण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात शिक्षक गणेश शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्यात अनुसूचित जमातीचे उमेदवार मिळत नाही. असे असताना मिळालेल्या उमेदवाला शिक्षण विभागाकडून मान्यता दिली जात नाही. मी पारधी समाजातील अनुसूचित प्रवर्गातील सहशिक्षक या पदावर सन 2011 पासून कार्यरत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाचा अनुशेष क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या दोनही शाळेत सन 2000 सालापासून शिल्लक आहे.

_MPC_DIR_MPU_II

परंतु, आजपर्यंत सुद्धा या अनुशेषाच्या पदाला शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाली नाही. त्यामुळे मी मुंबई उच्च न्यायालयात सन 2016 मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने 22 ऑगस्ट 2018 रोजी निकाल दिला. शिक्षक पदाला मान्यता देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. परंतु, मला अद्यापपर्यंत मान्यता मिळाली नाही. या मागणीसाठी मी पाच दिवस उपोषण केले. त्यावेळी आठवड्याभरात मान्यता देण्याचे आश्वासन देत उपोषण सोडण्यास भाग पडले.

आता उपोषण सोडल्यानंतर देखील मान्यता देण्यास सर्वच विभागातील अधिका-यांकडून पुन्हा टाळाटाळ सुरु केली आहे. केवळ मी पारधी समाजातील असल्याने कोणी दखल घेत नाही. संविधानातील कायदे, तरतुदी कोणी पाळत नाही. अधिकारी माझा मानसिक छळ, पिळवणूक करत आहेत. त्यामुळे या सर्व अधिका-यांच्या छळाला कंटाळलो असल्याने 5 मार्च 2020 रोजी उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहन करुन माझे जीवन संपविणार आहे असा इशारा शिक्षक शिंदे यांनी दिला आहे.

शिक्षक गणेश शिंदे म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयाने दोनवेळा आदेश देऊन सुद्धा शिक्षण विभाग दखल घेत नसेल. तर, मला न्याय मिळणार नाही. मग मी करायचे तरी काय?, जर माझ्या मरणाने शिक्षण विभागातील अधिकारी वर्गाला आनंद, सुख भेटणार असेल. तर, मी माझे जीवन संपत आहे” अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. “मी पारधी या भटक्या जमातीचा आहे. माझ्याकडे ना जमीन आहे ना राहण्यासाठी घर आहे. माझे आई-वडील आजही गावच्या बाहेर पालात राहून गुजराण करतात. माझा कोणी मंत्री, खासदार, आमदार वाली नाही. म्हणून सर्वजणांनी गेल्या दहावर्षांपासून माझा छळ केला आणि आजही करत आहेत. त्यामुळेच मी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहन करुन माझी जीवनयात्रा संपवत आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.