Pimpri : चोरी करू न दिल्याने चोरट्यांनी लावली चिंचवड एमआयडीसीच्या रद्दीला आग

एमपीसी न्यूज – रद्दीची चोरी करण्यापासून रोखले म्हणून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने सुरक्षारक्षकाला दमदाटी करत चिंचवड एमआयडीसीच्या रद्दीला आग लावली. ही घटना आज बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भाटनगर पिंपरी येथे घडली.

भाटनगर पिंपरी येथील ओल्ड वॉटर पंपच्या आवारात एमआयडीसी मधील कर्मचाऱ्यांचे क्वार्टर आहेत. त्याच ठिकाणी रिकाम्या असलेल्या तीन खोल्यांमध्ये चिंचवड एमआयडीसी कार्यालयातील रद्दी ठेवण्यात आली आहे. भाटनगर आणि अन्य परिसरातील काही टवाळखोर तरुण या रद्दीची चोरी करतात. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाच ते सहा तरुण रेल्वे लाईनच्या बाजूच्या भिंतीवरून उड्या मारून क्वार्टर परिसरात आले. ते रद्दीची चोरी करत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. यामुळे चोरी करणार्‍या तरुणांनी सुरक्षारक्षकाला दमदाटी करत खोल्यांमध्ये ठेवलेल्या रद्दीला आग लावून दिली.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. काही वेळेत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.