BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: कचराकोंडी; ए.जी. इनव्हायरो कंत्राटदाराने काम सुरु करण्यास, मागितली मुदतवाढ

बीव्हीजी इंडिया लिमिटेड एक एप्रिलपासून सुरु करणार काम

एमपीसी न्यूज – शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामाची निविदा मार्गी लागल्यानंतर वर्क ऑर्डर देऊनही आता काम सुरु करण्यास ए.जी. इनव्हायरो या कंत्राटदाराने तीन महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे महापालिकेला जुन्याच ठेकेदाराला आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी लागणार आहे. दरम्यान, ‘बीव्हीजी’ इंडिया लिमिटेड या ठेकेदाराने एक एप्रिलपासून काम सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या कामासाठी महापालिकेने 15 सप्टेंबर 2018 रोजी निविदा काढली होती. त्यानुसार कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी मुंबई-पुणे महामार्गाचा आधार घेत दक्षिण आणि उत्तर भागासाठी दोन स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या. दक्षिण विभागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना 28 कोटी 52 लाख आणि उत्तर विभागाचे काम बीव्हीजी इंडिया लिमिटेड 27 कोटी 90 लाख या दोन कंत्राटदारांना आठ वर्षांसाठी हे काम देण्यास 21 फेब्रुवारी 2018 रोजी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली होती.

  • दरम्यानच्या काळात नवीन स्थायी समिती अस्तित्वात आली. त्यांनी कंत्राट रद्द केले. पुन्हा सदस्य पारित प्रस्ताव करत कंत्राट मंजुर केले होते. पंरतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यास नकार देत नवीन निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर याबाबत ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी दरम्यान ए.जी. इनव्हायरो या कंत्राटदारालाच कामाचा ठेका देण्यात यावा. त्यांनी कमी केलेले सुधारित दर स्वीकृत करावेत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. ही प्रक्रिया तब्बल वर्षभर सुरु होती.

12 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या स्थायी समितीत उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड 21 कोटी 56 लाख आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स 22 कोटी 12 लाख देण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी महापालिकेने दोन्ही कंत्राटदारांना कामाची वर्क ऑर्डर दिली. तथापी, ठेकेदारांनी अद्याप काम सुरु केले नाही. ए.जी. इनव्हायरो या कंत्राटदाराने तीन महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. बीव्हीजी’ इंडिया लिमिटेड या ठेकेदाराने एक एप्रिलपासून काम सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे.

  • याबाबत बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे शहराच्या उत्तर भागाचे कंत्राट बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड आणि दक्षिण भागाचे ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना देण्यात आले आहे. या कामाची वर्क ऑर्डर देखील देण्यात आली आहे. मात्र, ए.जी. इनव्हायरो या कंत्राटदाराने काम सुरु करण्यास तीन महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. तर, ‘बीव्हीजी’ इंडिया लिमिटेड या ठेकेदाराने एक एप्रिलपासून काम सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. नवीन कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केल्यास कच-याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कोणतीही समस्या जाणवणार नाही”.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3